पाणंद रस्त्यासाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या; मसला येथील रस्ता, ४०० शेतकरी तहसिल कार्यालयात
By मारोती जुंबडे | Published: March 6, 2023 04:16 PM2023-03-06T16:16:03+5:302023-03-06T16:16:15+5:30
तालुक्यातील मसला येतील पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी अनेक दिवसापासून करण्यात येत आहे.
गंगाखेड : तालुक्यातील मसला येतील पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी अनेक दिवसापासून करण्यात येत आहे. वारंवार मागणीचे निवेदने, पत्रे तहसील कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करुन ग्रामस्थ थकले. प्रशासनाला जाग येत नसल्याने अखेर सोमवारी तहसिल कार्यालयात प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले.
गाव शिवारातून गेलेला मसला ते अंगलगाव हा रस्ता काळाच्या ओघात जवळपास पूर्ण बुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे ४०० शेतकरी आपल्या शेती कामासाठी प्रचंड गैरसोयीचा सामना करत असतात. हा पाणंद रस्ता आतिक्रमणमुक्त करण्यासाठी अनेकवेळा निवेदने देऊनही प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचे पाहून मसला ग्रामस्थांनी ८ दिवसापूर्वी तहसील कार्यालयास निवेदन देऊन होळीच्या दिवशी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे शेतकऱ्यांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ६ मार्च रोजी तहसील कार्यालयात जमा झाले.
त्यानंतर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करुन तत्काळ रस्ता मोकळा करुन देण्याची मागणी केली. त्यानंतर तहसीलदारांनी आंदोलक शेतकरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दालनात बोलावून शेतकऱ्यांची समजूत काढली. मात्र आंदोलक एैकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर तहसीलदार गोविंद येरमे मसला गावाकडे रवाना झाले. त्यांनी अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना नोटीसा बजावल्या. आठ दिवसात रस्ता मोकळा करुन देण्याचे आदेश दिले. त्यानंतर आंदोलनकर्तांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भगवान शिंदे, भास्कर खटिंग, गजानन तुरे, मुंजाभाऊ लोडे, अंकुश शिंदे, उध्दव जवांजाल, दिगंबर पवार, सुभाष पवार, गणपतराव शिंदे, बाळासाहेब शिंदे, आप्पासाहेब कदम, शिवाजी शिंदे, नागेश शिंदे, अंबादास शिंदे, मारोतराव शिंदे, विठ्टलराव चेअरमन, प्रकाश शिंदे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी हजर होते.