ज्यांना ‘ईडी’ची भीती; तेच पक्षातून बाहेर -सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:03 PM2019-09-10T13:03:11+5:302019-09-10T13:05:10+5:30
कार्यकर्त्यांनी चर्चेकडे लक्ष न देता जोमाने लढावे
वसमत (जि. हिंगोली) : ईडी, सीबीआयची भीती, कारखाने, बँकांना मदतीचे आमिष दाखवून पक्षांतर घडवले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे कधी झाले नाही. पक्षांतर करणाऱ्या सर्वांना मंत्रीपद देण्याचेही आमिष दिले जात असल्याने भाजपचे सरकार पुन्हा आलेच तर सर्व मंत्री आमचेच राहतील, असा टोला राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांनी लगावला. वसमत येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
वसमत येथे त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. महाविद्यालयीन तरूणांशीही त्यांनी संवाद साधला. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी सर्व शक्तीनिशी लढा, असे आवाहन केले. शरद पवार यांनी आजवर अन्य पक्षांचे नेते फोडले, पक्ष फोडले, त्यात व आजच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोडण्याचा प्रकार यातील फरक काय, असा प्रश्न विचारला असता त्यांनी असे प्रकार शरद पवार यांनी कधी केले नाही. त्या काळात जे पक्षांतर झाले ते तत्त्वाचे राजकारण होते, असे सांगितले. ईव्हीएमबद्दल शंका आहे, या मुद्यावर आंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवा यश आपलेच आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चर्चेकडे लक्ष न देता जोमाने लढावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यात मंदी ही सरकारच्या धोरणांचा परिपाक
भाजप सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच देशात आर्थिक मंदीची लाट निर्माण झाली असून त्याचा त्रास आता सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे, असा आरोप खा. सुप्रिया सुळे यांनी सोमवारी सायंकाळी येथे केला. परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यात रोजगाराचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातही बेरोजगारीचा प्रश्न अधिक चिंताजनक आहे. आज महाराष्ट्र कोणत्याच क्षेत्रात आघाडीवर नाही; परंतु, महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबतीत मात्र राज्य आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.