महादेव मंदिराची घंटा चोरताना सापडले, चौकशीत देवीची दानपेटी पळवल्याचीही दिली कबुली
By ज्ञानेश्वर भाले | Published: December 2, 2023 05:14 PM2023-12-02T17:14:22+5:302023-12-02T17:14:55+5:30
सेलू पोलिसांचा तपास; मंदीरातील घंटा चोरणाऱ्या आरोपींनी केला होता दुसरा गुन्हा
सेलू (जि. परभणी) : तिडी पिंपळगाव येथील मंदिरातील काश्याची घंटा चोरून नेताना फिर्यादीसह काहींनी पाठलाग करत चोरट्यांना पकडून सेलू पोलिसांच्या स्वाधिन केले. त्यानंतर पोलीस तपासात देवी मंदीरातील दानपेटी चोरून ती विहिरीत फेकून दिल्याची कबुली आरोपींकडून मिळाली. शनिवारी दुपारी एकला पोलिसांनी ही दानपेटी विहीरीतून बाहेर काढली.
तिडी पिंपळगाव येथील महादेव मंदिरातील घंटा चोरून नेतांना किशोर घुंबरे व काशिनाथ घुंबरे यांनी पाठलाग करीत आरोपी सावळीराम साहेब शिंदे, किशोर भगवान राऊत (दोघे रा. फुलेनगर, पाथरी) यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन १९ नोव्हेंबर रोजी सेलू पोलिसांच्या स्वाधीन केले. किशोर घुंबरे यांचे फिर्यादीवरून या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पो.नी.समाधान चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी पंडित यांनी तपास केला. या दरम्यान आरोपींनी येथील देवी मंदिरातून ९ नोव्हेंबर रोजी रात्री दानपेटी चोरून नेल्याची कबुली दिली. दानपेटीत ६ हजार ५०० हजार रूपये देणगी रक्कम निघाली. ती दोघांत वाटून घेतली व दानपेटी बांदरवाडा परिसरात एका विहीरीत फेकून दिल्याचे आरोपींनी सांगितले.
दरम्यान, पोउपनी पंडीत,पो.ना.कोपनार,अझहर यांनी शनिवारी दुपारी १ वा. काही तरुणांच्या सहकार्याने त्या विहीरीतून दानपेटी बाहेर काढली.याशिवाय या आरोपींनी मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २ व आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ गुन्हा उघडकीस आणला आहे