परभणी शहरात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:31 AM2019-02-28T00:31:12+5:302019-02-28T00:31:18+5:30
महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील जलवाहिनीमधून बुधवारी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला़ नळांना पाणी आल्यानंतर पेडा हनुमान परिसर तसेच विसावा कॉर्नर भागात रस्त्याच्या कडेने पाण्याचे लोट वाहत होते़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील जलवाहिनीमधून बुधवारी हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला़ नळांना पाणी आल्यानंतर पेडा हनुमान परिसर तसेच विसावा कॉर्नर भागात रस्त्याच्या कडेने पाण्याचे लोट वाहत होते़
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असताना परभणी शहरात मात्र जलवाहिनीच्या गळतीतून पाण्याचा अपव्यय होत आहे़ २७ फेब्रुवारी रोजी नळाला पाणी आल्यानंतर पेडा हनुमान परिसरात असलेल्या जलवाहिनीच्या गळतीतून पाणी रस्त्यावर वाहत होते़ या पाण्याचा लोंढा स्टेशन रोडपर्यंत पोहचला़ तसेच जिल्हा परिषद कन्या शाळेजवळ महाराष्ट्र बँकेच्यासमोर जलवाहिनी फुटली असून, या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले़
या पाण्याचा लोंढा सिटीक्लबपर्यंत पोहचला होता़ रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पहावयास मिळाले़ याच भागातील जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील नळाद्वारेही बुधवारी पाण्याचा अपव्यय झाला़ १ ते २ तासांमध्ये हजारो लिटर पाणी वाया गेले आहे़ शहरातील जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्याची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी मागणी होत असताना गळती दुरुस्तीला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसत आहे़ परिणामी पाण्याचा अपव्यय होत आहे़
पत्र देऊनही होईना कारवाई
शहरातील पेडा हनुमान परिसरात पाईप फुटल्याने पाणी वाया जात असल्याची माहिती २१ डिसेंबर रोजी एका नागरिकाने महापालिकेला पत्राद्वारे दिली आहे़ या पाईपमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते़ तेव्हा फुटलेला पाईप दुुरुस्त करावा, अशी मागणी करण्यात आली़ मात्र दोन महिने उलटूनही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केली नाही़ त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे़