परभणीत हजारो मुस्लिम महिला रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:55 AM2018-03-29T00:55:04+5:302018-03-29T00:55:04+5:30
केंद्र शासनाने ट्रिपल तलाक बिल रद्द करावे तसेच मुस्लिम शरियत कायद्यात हस्तक्षेप करू नये, या मागणीसाठी २८ मार्च रोजी परभणी शहरातून मुस्लिम महिलांनी अब्दुल रशिद इंजिनिअर यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढला़ या मोर्चात हजारो महिला हातात फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्र शासनाने ट्रिपल तलाक बिल रद्द करावे तसेच मुस्लिम शरियत कायद्यात हस्तक्षेप करू नये, या मागणीसाठी २८ मार्च रोजी परभणी शहरातून मुस्लिम महिलांनी अब्दुल रशिद इंजिनिअर यांच्या नेतृत्वात मूक मोर्चा काढला़ या मोर्चात हजारो महिला हातात फलक घेऊन सहभागी झाल्या होत्या़
बुधवारी तळपत्या उन्हात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ जिंतूर रोडवरील ईदगाह मैदान येथून दुपारी २.३० वाजेच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात झाली़ मोर्चात परभणी शहरासह जिल्हाभरातील मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या़ ईदगाह मैदानापासून दुपारी २़३० वाजता शांततेत आणि शिस्तीत निघालेला हा मोर्चा सरकारी दवाखान्यासमोरून शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, आरआर टॉवर, नारायण चाळ, विसावा कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर ३़३० वाजता पोहचला़ मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी हातात फलक घेऊन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले़ ट्रिपल तलाक बिल रद्द करावे, शरियतमधील हस्तक्षेप थांबवावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़ मोर्चा दरम्यान स्वयंसेवक ठिक ठिकाणी नियोजनात व्यस्त असल्याचे पहावयास मिळाले़ हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर या ठिकाणी मोजक्याच महिलांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ तसेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय सचिव मौलाना उमरैन यांनीही मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केले़ ते म्हणाले, मुस्लिम समाजाविषयी केंद्र शासन अनेक समस्या निर्माण करीत आहे; परंतु, या मोर्चातील महिलांची उपस्थिती पाहता सरकार झुकेल आणि ट्रिपल तलाकचे बिल सरकारला परत घ्यावे लागेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला़ केंद्र सरकार मुस्लिमांविषयी खोटी सहानुभूती दाखवित असून, त्याचा वेळावेळी पर्दाफाश झाला असल्याचेही मौलाना उमरैन म्हणाले़ यावेळी मोर्चा समितीच्या अध्यक्षा दरकशाँ इरफाना, नाजमीन शकील, सिद्दीखा समर, सय्यदा नुदरत परवीन, आयशा कौसर, डॉ़ फौजिया अमीन, मलेका गफार यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविले़
केंद्र सरकार ढोंगी
महिलांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचल्यानंतर या ठिकाणी नाजमीन शकील, सय्यदा सीमा गाझी जावेद, प्राचार्या सिद्दीका समर सालेहाती, सय्यदा नूदरत परवीन, डॉ़ फौजिया अमीन, आयशा कौसर, माजीमंत्री फौजिया खान यांनी मार्गदर्शन केले़
मुस्लिम समाजाविषयी केंद्र शासन खोटी सहानुभूती दाखवित आहे़ तलाक तो एक बहाना है शरियत निशाना है, मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे़ शरियत आमचे प्राण आहे़ त्यामुळे शरियतमध्ये हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला़
शरियतमधील हस्तक्षेप थांबवा
परभणी : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला त्यांच्या धर्मानुसार आचारण करण्याचा अधिकार दिला आहे़ त्यामुळे केंद्र शासनाने मुस्लिम धर्मियांच्या शरियतमधील हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरैन महेफुज रहेमानी यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली़
केंद्र शासनाच्या तीन तलाक विधेयकास विरोध करण्यासाठी मुस्लिम महिलांच्या मोर्चाचे बुधवारी परभणीत आयोजन करण्यात आले होते़ या मोर्चानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरैन महेफुज रहेमानी म्हणाले की, केंद्र शासनाने मुस्लिम समाजातील महिलांवर अन्याय होत असल्याची चुकीची माहिती समाजात पसरविली़ प्रत्यक्षात देशातील मुस्लिम महिला पूर्णपणे सुरक्षित आहेत, असे असताना तीन तलाक विधेयक लोकसभेत मंजूर करून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत़ त्यामुळे या विधेयकाला देशभर प्रचंड विरोध केला जात आहे़ आतापर्यंत या विरोधात देशात १५० ठिकाणी महिलांचे मोर्चे काढण्यात आले आहेत़ त्यामध्ये ९० लाखांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला आहे़ मराठवाड्यातही सर्वच जिल्ह्यांमध्ये या विधेयकाविरोधात मोर्चे काढण्यात आले आहेत़ भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्मानुसार आचारण करण्याचा अधिकार दिला आहे़ त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक बाबींमध्ये केंद्र शासनाने हस्तक्षेप करू नये़ देशासमोर बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यासारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते अगोदर सोडवावेत, असेही रहेमानी म्हणाले़ यावेळी मौलाना जुनेद, डॉ़ तय्यब बुखारी, मुफ्ती गौस खासमी, मो़ अल्ताफ मेमन, गौस झैन आदींची उपस्थिती होती़