ग्रामस्थांनी पकडलेला वाळु वाहतुक करणारा ट्रक तहसील कर्मचा-यांनी क्षणार्धात दिला सोडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:22 PM2017-11-01T12:22:38+5:302017-11-01T15:22:22+5:30
गंगाखेड तालुक्यातील खळी येथील ग्रामस्थांनी वाळूची वाहतूक करणा-या वाहनास ३१ आॅक्टोबर रोजी पकडले होते. परंतु, पकडलेले वाहन तहसीलच्या कर्मचा-यांनी सोडून दिल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
परभणी : गंगाखेड तालुक्यातील खळी येथील ग्रामस्थांनी वाळूची वाहतूक करणा-या वाहनास ३१ आॅक्टोबर रोजी पकडले होते. परंतु, पकडलेले वाहन तहसीलच्या कर्मचा-यांनी सोडून दिल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
गंगाखेड तालुक्यातील खळी, मैराळ सावंगी, चिंचटाकळी, गौंडगाव आदी परिसरातून रात्र-दिवस वाळूचा उपसा होत आहे. या वाळू उपस्याच्या त्रासाला कंटाळून खळी येथील ग्रामस्थांनी वाळू उपस्यास प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला. ३१ आॅक़्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मैराळ सावंगी येथून खळीमार्गे परभणीकडे वाळूने भरलेले टिप्पर जात होते. खळी ग्रामस्थांनी हे टिप्पर मारोती देवस्थान जमिनीजवळ अडविले. यावेळी चालक व मालकाने अडविलेले टिप्पर सोडून देण्यात यावे, अशी विनवणी केली. परंतु, ग्रामस्थांनी नकार दिला. त्यानंतर ही माहिती तहसीलदार आसाराम छडीदार, तलाठी चंद्रकांत साळवी यांना दिली.
याचवेळी खळी पाटीवर महसूल विभागाचे कर्मचारी आले होते. वाहनचालक व मालकाने खळी पाटीवर थांबलेल्या कर्मचा-यांकडे धाव घेतली. तेथील एका हॉटेलवर कर्मचारी व टिप्पर चालक-मालकाने चहापाणी घेतले. त्यानंतर हे वाहन कर्मचा-याने सोडून दिले. याबाबत ग्रामस्थांनी कर्मचा-यांना विचारणा केली असता त्या कर्मचा-यांनी काहीच माहित नसल्याचे सांगितले व बोलण्याचे टाळले़ यावेळी प्रहार संघटनेचे सुरेश विखे, ओंकार पवार, रमेशराव पवार आदीची उपस्थिती होती. दरम्यान, छडीदार यांनी पाठविलेले कर्मचारी येण्या आगोदरच वाहन निघुन गेल्याने आलेले कर्मचारीही रिकाम्या हाताने परतले.