हाताला काम नसल्याने जिंतूर तालुक्यातून हजारो मजुरांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 08:30 PM2018-03-27T20:30:29+5:302018-03-27T20:30:29+5:30
मनरेगांतर्गत तालुक्यात एकही काम सुरू झाले नसल्याने हजारो मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासन मात्र काम सुरू करण्याच्या मन:स्थितीत नाही.
जिंतूर ( परभणी ) : मनरेगांतर्गत तालुक्यात एकही काम सुरू झाले नसल्याने हजारो मजुरांना कामासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासन मात्र काम सुरू करण्याच्या मन:स्थितीत नाही. २०१६-१७ मधील ५ कोटींची कामे अजूनही सुरू झालेली नाहीत.
जिंतूर तालुका हा डोंगराळ भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यात शेतीशिवाय दुसरे कोणतेच उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध नाही. परिणामी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत कामासाठी मजुरांना वन वन भटकंती करावी लागते. मागील पाच वर्षापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात मनरेगांतर्गत कामे होत असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळत होते; परंतु, मागील दोन वर्षात प्रशासकीय व राजकीय पातळीवर गोंधळ उडाला आहे. विशेष करून सिंचन विहीर व रस्त्याच्या कामात मोठे गैरप्रकार झाले. अनेक अधिकार्यांवर कार्यवाही झाली. त्यामुळे मनरेगाची कामे ठप्प झाली आहेत.
तालुक्यात ६२५ सिंचन विहिरी दोन वर्षापूर्वी बोगस असल्याचे समोर आले. विधीमंडळात हे प्रकरण चांगलेच गाजले. तब्बल ६ कोटी रुपयांचा हा गैरप्रकार उजेडात आला. परिणामी अनेक अधिकार्यांना चौकशीला सामोरे जावे लागले. त्यामुळे मागील दोन वर्षापासून मनरेगााची कामे बंद झाली आहेत. यावर्षी अत्यंत बिकट परिस्थिती जिंतूर तालुक्यात निर्माण झाली आहे. तालुक्यातील मजुरांच्या हाताला कामे नाहीत. गावात पाणीटंचाईच्या तीव्र झळा ग्रामस्थांना सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे मजुरी करणार्या मजुरांना हालाकीचे जीवन जगावे लागत आहे. आजघडीला मनरेगांतर्गत एकही काम नाही. मात्र स्वच्छ भारत अभियानांतर्गत शोष खड्डे, रोपवाटिका या कामांना मंजुरी आहे; परंतु, प्रत्यक्षात कामच सुरू नाही. शिवाय शोष खड्डे जेसीबी मशिनने खोदले जात आहेत. त्यामुळे मजुरांना तालुक्यात काम उपलब्ध नसल्याने मजूृर वर्ग हतबल झाला आहे. कामाच्या शोधासाठी ते मुंबई, पुणे, नाशिककडे स्थलांतरित होत आहेत. याचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाला कोणतेही सोयरसुतक नाही.
५ कोटींची कामे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत
तालुक्यात दोन वर्षापासून मनरेगाची कामे बंद आहेत. परंतु, २०१६-१७ या वर्षात तांत्रिक मंजुरी मिळालेल्या कामात कृषी विभागाच्या ५३ लाखांचे ५१ नाडेपचे अर्ज प्रलंबित आहे. व्हर्मी कंपोस्टिंगचे १४ लाख ११ हजारांचे २१८ प्रस्ताव पं.स. अंतर्गत येणारे २ लाख १० हजारांचे ८० शोष खड्डे, सामाजिक वनीकरण विभागाच्या १ कोटी १ लाख ८४ हजार रुपयांच्या रोपवाटिका, वनपरीक्षेत्र विभाागाच्या ३ कोटी १८ लाख ३९ हजारांच्या रोपवाटिका, सलग समपातळी चरचे ४७ लाख ५५ हजारांची कामे, अनघड दगडी बांधचे १६ लाख ९८ हजार अशा एकूण ५ कोटी १ लाख ३७ हजार ३७२ रुपयांच्या कामांना २०१६-१७ मध्ये तांत्रिक मंजुुरी मिळवूनही ही कामे सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
अधिकारी नाचवित आहेत कागदी घोडे
जिंतूर तालुक्यात कामे सुरू करण्याची अधिकार्यांची मानसिकता नाही. त्यामुळे कागदोपत्री कामे मंजूर असल्याचे सांगत वेळ निभावून नेण्याचे धोरण अधिकारी वर्गाचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे मजुरांना काम मिळेल, असे एकही काम सुरू नाही.
कामांना अद्याप सुरूवात नाही
पंचायत समितीमार्फत केवळ शोष खड्डे व विहीर पूनर्भरणाची कामे सुरू आहेत. परंतु, सिंचन विहिरींना अद्याप मंजुरी नाही. त्यामुळे रस्ते व इतर कामांना अद्याप तालुक्यात सुरूवात नाही.
-अंकुश चव्हाण, गटविकास अधिकारी
आंदोलन करावे लागेल.
तालुक्यात मनरेगांतर्गत कामे सुरू करण्याची प्रशासनाची मानसिकता नाही. जिल्हाधिकारी, आयुक्त शिवाय विधिमंडळामध्ये आवाज उठवूनही प्रशासन जागे होत नाही. त्यामुळे आता रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल.
-विजय भांबळे, आमदार जिंतूर