देशीदारूच्या तेवीस बॉक्ससह साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 07:29 PM2019-06-25T19:29:20+5:302019-06-25T19:31:21+5:30
पोलिसांनी टेम्पोसह तीन लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गंगाखेड (परभणी ) : चोरट्या व विनापरवाना विक्रीसाठी जात असलेल्या देशी दारूच्या तेवीस बॉक्स पोलिसांनी ताब्यात घेतले. यात पोलिसांनी टेम्पोसह तीन लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी (दि.२४ ) सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
बसस्थानक परिसरात गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके व पोलीस शिपाई जिलानी शेख यांना शहरातील दत्त मंदिर परिसरातून एका टेम्पोतून ( क्रमांक एम एच २२ ए एन ०६६३ ) चोरट्या व विनापरवाना विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात देशीदारू नेत असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके, पोलीस नाईक प्रविण कांबळे, पोलीस शिपाई जिलानी शेख, मुक्तार पठाण यांच्या पथकाने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास इटारसी नदी पुलाजवळ हा टेम्पो आडवला. यावेळी त्यात देशीदारूचे २३ बॉक्स आढळुन आले. विक्री व वाहतुकीचा परवाना चालकाजवळ नसल्याने पोलिसांनी टेम्पो व बॉक्स असा एकुण ३५५२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सुभाष पवार (२७) व लखन विश्वनाथ जाधव (२१, दोघे राहणार गौतम नगर ) यांना ताब्यात घेतले.