गाडीच्या काचा फोडून साडेतीन लाख पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:20 AM2021-09-21T04:20:24+5:302021-09-21T04:20:24+5:30
पालम : चारचाकी गाडीच्या काचा फोडून साडेतीन लाख रुपये लंपास केल्याची घटना शहरातील मोंढा परिसरात २० सप्टेंबर रोजी दुपारी ...
पालम : चारचाकी गाडीच्या काचा फोडून साडेतीन लाख रुपये लंपास केल्याची घटना शहरातील मोंढा परिसरात २० सप्टेंबर रोजी दुपारी १.३० च्या सुमारास घडली आहे.
पालम तालुक्यातील उमरा येथील साहेबराव माधवराव उगले ( ४५) यांनी गंगाखेड शहरातील आयडीबीआय बँकेतून साडेतीन लाख रुपये काढले. ते स्वतःच्या एमएच-२२/ एएम-२८८२ क्रमांकाच्या चारचाकी गाडीच्या मधल्या सीटवर बसले होते व त्यांच्या उजव्या बाजूला एका बॅगमध्ये पैसे ठेवले होते. बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी साहेबराव उगले सोमवारी पालम शहरात आले होते. त्यांनी मोंढा परिसरातील एका हार्डवेअरच्या दुकानासमोर गाडी उभी केली. तेव्हा चोरट्यांनी गाडीच्या काचा फोडून पैशांची बॅग लांबविली. शहरातील एका पेट्रोलपंपावर गेल्यावर हा प्रकार उगले यांच्या लक्षात आला. बॅगमध्ये असलेल्या पैशांसोबत चेकबुक, पॅनकार्ड, आधारकार्ड, मजूर संस्थेची कागदपत्रे आदी महत्त्वाची कागदपत्रेही चोरट्यांनी लांबिवली आहेत.
या प्रकारानंतर साहेबराव उगले यांनी पालम पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल बाहतरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विनोद साने तपास करीत आहेत.