घरफोडी, दुचाकी चोरीतील तिघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:12 AM2021-01-01T04:12:25+5:302021-01-01T04:12:25+5:30
परभणी : लॉकडाऊन काळात घरफोडी करणाऱ्या दोघांसह दुचाकी चोरणाऱ्या एकाला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जेरबंद केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ...
परभणी : लॉकडाऊन काळात घरफोडी करणाऱ्या दोघांसह दुचाकी चोरणाऱ्या एकाला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जेरबंद केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल ते जून याकाळात लॉकडाऊन करण्यात आले होते. तसेच याकाळात अनेकजण क्वारंटाईन असल्याने त्यांच्या घरांना कुलूप होते. हीच संधी साधत चोरट्यांनी अनेक घरांमध्ये चोरी करत तेथील सोन्या-चांदीच्या वस्तूंसह रोख रक्कम लांबवली होती. परभणी शहरातील एका घरातील सदस्याला कोरोना झाल्याने घऱातील अन्य सदस्यांना आरोग्य विभागाने क्वारंटाईन केले होते. त्यामुळे घराला कुलूप होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील रोख रक्कम लांबवली होती. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने या चोरीप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही चोरट्यांना नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले. विशेष पथकाचे फौजदार विश्वास खोले, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, राहुल चिंचाणे, जमीर फारोकी, शंकर गायकवाड, अरुण कांबळे यांनी ही कारवाई केली. त्याचप्रमाणे शहरात गस्त घालताना एकजण संशयितरित्या फिरत असल्याचे बुधवारीे रात्री निदर्शनास आले. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने या संशयिताकडे चौकशी केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीविषयी संशय बळावल्याने अधिक चौकशी केली असता, लॉकडाऊन काळात परजिल्ह्यातून ही दुचाकी चोरल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, दुचाकी जप्त केली आहे.