काळ्या बाजारात तांदूळ विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:54+5:302021-03-22T04:15:54+5:30

सेलू : शासनाच्या सार्वजनिक वितरणप्रणाली अंतर्गत रेशनचा ८ टन तांदूळ अवैधरित्या काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रकमधून नेल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सेलू ...

Three arrested for selling rice on black market | काळ्या बाजारात तांदूळ विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा

काळ्या बाजारात तांदूळ विक्री प्रकरणी तिघांवर गुन्हा

Next

सेलू : शासनाच्या सार्वजनिक वितरणप्रणाली अंतर्गत रेशनचा ८ टन तांदूळ अवैधरित्या काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रकमधून नेल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात २० मार्च रोजी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून २ लाख ८० हजार रुपये किमतीचा तांदूळ आणि ५ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणात राशन गोडऊन मालक जय आप्पा अंभोरे (रा. मोती नगर, सेलू), ट्रक चालक शेख रहीम शेख उस्मान (रा.मोमीनपुरा, मंठा), इसाभाई कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, मंठा) या तिन्ही आरोपीविरुद्ध नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ मार्च रोजी सेलू येथील नूतन महाविद्यालयासमोर परभणी स्थानिक गुन्हा शाखा व सेलू पोलिसांच्या पथकाने कारवाई करून आरोपीकडून ८ टन रेशनच्या तांदळाने भरलेला आशयर ट्रक (एमएच ०४/डीडी-३१९५) पाठलाग करून पकडला होता. ट्रकमध्ये १०७ कट्ट्यांमध्ये ८ टन तांदळासह रिकामे पोते, पोते शिलाई करण्याची मशीन आढळून आली. ट्रकचालक शेख रहीम यास ताब्यात घेतल्यानंतर संबंधित ट्रक देऊळगाव गात येथील गोडाऊनमधून भरून मंठा येथे तांदूळ घेऊन जात असल्याचे सांगितले होते. महसूल प्रशासनाकडून प्राप्त अहवालात तांदूळ रेशनचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थागुशाचे सहायक पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे, कर्मचारी बालासाहेब तुपसमिंद्रे, शेख मोबीन, रामेश्वर मुंडे आदींच्या पथकाने केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे हे करीत आहेत.

आरोपी मोकाट

काळ्या बाजारात तांदूळ विक्री केल्याप्रकरणी सेलू पोलिसांत ट्रकमालक, चालक व राशन गाेडाऊन मालक यांच्यावर गुन्हा दाखल असला तरी तिन्ही आरोपी उजळ माथ्याने फिरत आहेत. रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या सक्रिय टोळीशी आरोपींचा संबंध आहे का? याचाही शोध घेतला जावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Three arrested for selling rice on black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.