जिंतुरात एकाच रात्री तीन घरे फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:18 AM2021-03-16T04:18:27+5:302021-03-16T04:18:27+5:30
शहरातील बलसारोडवरील साई मंदिर परिसरातील रहिवासी निवृत्त पोलीस कर्मचारी गणपत राठोड हे शेतीच्या कामासाठी चिंचोली काळे येथे मागील आठ ...
शहरातील बलसारोडवरील साई मंदिर परिसरातील रहिवासी निवृत्त पोलीस कर्मचारी गणपत राठोड हे शेतीच्या कामासाठी चिंचोली काळे येथे मागील आठ दिवसांपासून गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचे चॅनलगेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लहान मुलांचे सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह कपाटात ठेवलेले कपडे लांबविले. दुसऱ्या एका घटनेत शहरातील बामणी प्लॉट भागात राहणारे डॉ.माणिक दादाराव तारे यांचे कुटुंब नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यामध्ये घरात ठेवलेले रोख ४० हजार रुपये, सोने व चांदीचे दागिणे असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तर तिसऱ्या एका घटनेत शहरातील डॉ.जाकेर हुसेन नगर भागात राहणारे शाहेद खा अहेमद खा पठाण यांचे कुटुंबीय घराला कुलूप लावून गावी गेले होते. हे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह५४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सीसीटीव्हीत चोरटे जेरबंद
पालम: तालुक्यातील चाटोरी येथे चोरट्यांनी १५ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाटोरी येथे चोरट्यांनी एक दुकान फोडण्याचा सोमवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास प्रयत्न केला. मात्र काही ग्रामस्थ जागे झाल्याची कुणकुण चोरट्यांना लागली. त्यामुळे चोरट्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.