तीन लाख बालकांना दिली जाणार जंतनाशक गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:20 AM2021-09-21T04:20:15+5:302021-09-21T04:20:15+5:30
परभणी : राष्ट्रीय जंतनाशक दिना (दि. २१ सप्टेंबर) निमित्त आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात वय वर्षे एक ते १९ या वयोगटातील ...
परभणी : राष्ट्रीय जंतनाशक दिना (दि. २१ सप्टेंबर) निमित्त आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात वय वर्षे एक ते १९ या वयोगटातील लाभार्थ्यांना (बालक व किशोरवयीन मुले-मुली) जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत.
मुलांमध्ये जंतदोष निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने ही मोहीम राबविली जात आहे. त्यात अंगणवाडीमध्ये नोंद असलेल्या ७८ हजार ९३७ बालकांसह विविध शाळांमधील विद्यार्थी तसेच २ हजार ६४६ शाळाबाह्य बालकांसह ३ लाख ६ हजार ३७३ बालांना ही जंतनाशक गोळी दिली जाणार आहे. ९७० आशा सेविका, १ हजार ६८५ अंगणवाडी केंद्रे, १ हजार १८० शाळा, ३४६ खासगी शाळा, २४ तांत्रिक शिक्षण संस्था यांच्यामार्फत ही मोहीम राबविली जाणार आहे. वंचित बालकांना २८ सप्टेंबर रोजी विशेष मोहीम राबवून ही गोळी दिली जाणार आहे.
गोळी दिलेल्या बालकांची नोंद ठेवा - गोयल
जंतनाशक गोळी वाटप मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी गोळी दिलेल्या प्रत्येक बालकाची नोंद घेण्याच्या सूचना गोयल यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.पी. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, ओमप्रकाश यादव, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, आरएमओ डॉ. किशोर सुरवसे, मनपाच्या आरोग्याधिकारी डॉ. कल्पना सावंत आदींसह वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, कार्यक्रम समन्वयक आदींची उपस्थिती होती.
अशी दिली जाणार गोळी
अल्बेन्डोझोल ४०० मि. ग्रॅ. ही गोळी चावून खाण्यास देण्यात येईल. एक ते दोन वर्षे वय असलेल्या बालकास अर्धी गोळी पावडर करून पाण्यात विरघळून, तर दोन ते तीन वर्षे वयाच्या बालकास एक गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येईल. गोळी घेताना बालकाने नाश्ता अथवा जेवण केलेले असणे आवश्यक आहे.