परभणी जिल्हाभरात ४८ नवे संशयित दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:35 AM2020-04-16T00:35:11+5:302020-04-16T00:35:33+5:30
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बुधवारी ४८ नवीन संशयित दाखल झाले असून, त्यापैकी ३० जणांचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बुधवारी ४८ नवीन संशयित दाखल झाले असून, त्यापैकी ३० जणांचे स्वॅब नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत़ जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही़
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत़ जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयामध्ये संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे़ बुधवारी एकूण ४८ संशयित नागरिक जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत़ जिल्ह्यात आतापर्यंत ४१७ संशयितांची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे़ त्यापैकी ३६३ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते़ २९३ स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. ५३ जणांचे अहवाल अजूनही प्रलंबित आहेत़
आतापर्यंत नोंद झालेल्या ४१७ संशयितांपैकी १४४ संशयितांचे विलगीकरण करण्यात आले असून, ५३ जणांवर रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षामध्ये उपचार सुरू आहेत़ २२० नागरिकांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे़ दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची आणखी काही दिवस काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
अंत्यसंस्काराच्या निमित्ताने लग्नाला जाणाऱ्या ६ जणांवर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : जवळचे नातेवाईक वारल्याने अंत्यविधीसाठी जात असल्याचे कारण सांगून लग्नाला जाणाºया हिंगोली जिल्ह्यातील सहा जणांवर जिंतूर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
जिंतूर शहरातील फतन कॉलनीमध्ये एका विवाह सोहळ्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील गोळेगाव व पुसेगाव येथील काही नागरिक एमएच-११-एम-११७५ या वाहनाने १५ एप्रिल रोजी पहाटे ४.४५ वाजता शहरात पोहोचले. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ पेट्रोलिंग करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय दंडवत यांनी संबंधितांची चौकशी केली. यावेळी शहरातील आमचे नातेवाईक समंदर उर्फ कलंदर उर्फ करीम याचे निधन झाले असून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जात आहोत, अशी खोटी बतावणी त्यांनी केली. पोलिसांनी संबंधितांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता हे व्यक्ती जिंतूर येथील फतन कॉलनीतील एका विवाह सोहळ्यासाठी गोळेगाव येथून आले असल्याचे स्पष्ट झाले़ त्यानंतर पोलिसांनी जीप चालक नागोराव हरिभाऊ गुंजावळे, शेख नजीर शेख अहमद, आसेफबी शेख नजीर, निलोफर शेख मुनीर, शेख मेहमुदाबी माजिद, शेख मुनीर शेख कलीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांचे वाहन जप्त केले आहे.