परभणी जिल्ह्यात वर्षभरात १०८ जणांचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 07:58 PM2020-02-21T19:58:11+5:302020-02-21T19:59:42+5:30

१५० गंभीर स्वरुपाच्या तर ४२ किरकोळ अपघातांचीही नोंद

Three persons die in accident in Parbhani district during the year | परभणी जिल्ह्यात वर्षभरात १०८ जणांचा अपघातात मृत्यू

परभणी जिल्ह्यात वर्षभरात १०८ जणांचा अपघातात मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात वाढत्या दुर्घटनाने चिंता वाढली 

परभणी : मागील वर्षात जिल्ह्यामध्ये एकूण २९९ अपघातांची नोंद झाली असून, त्यात तब्बल १०८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे़ अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ वाढत्या अपघातांना वेगवेगळी कारणे असली तरी त्यात प्रमुख्याने निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वास या दोन कारणांचा समावेश असून, अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी वाहनधारकांमध्ये प्रभावी जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे़ 

परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्ग अस्तित्वात आहेत़ या मार्गावरून दररोज हजारो वाहने धावतात़ त्यातच मागील काही वर्षांपासून रस्त्यावर होणाऱ्या अपघाताची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे़ जानेवारी ते डिसेंबर २०१९ या एक वर्षामध्ये जिल्ह्यात तब्बल २९१ अपघातांची नोंद पोलीस दप्तरी झाली असून, त्यामध्ये १०८ जणांना जीव गमवावा लागला आहे़ भरधाव वेगाने धावणारी वाहने आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने अपघातासारख्या संकटाला सामोरे जावे लागते; परंतु, या संकटांची तमा न बाळगता किंवा अज्ञानातून नियमांचे उल्लंघन केले जाते़ परिणामी अपघातांची संख्या वाढत चालली आहे़ उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात १०३ गंभीर स्वरुपाचे अपघात झाले.

या अपघातांमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे़ त्यात मृत्यूची संख्या १०८ एवढी आहे़ त्यामध्ये ९७ पुरुष आणि ११ महिलांना जीव गमवावा लागला आहे़ याशिवाय १२५ अपघातांमध्ये १५७ जणांना गंभीर स्वरुपाची इजा झाली आहे़ तर ४२ अपघातात ५० जणांना किरकोळ मार लागल्याची नोंद आहे़ या १२ महिन्यांत २१ अपघातांमध्ये कोणालाही इजा झाली नाही़ जिल्ह्यातील अपघातांच्या या आकडेवारीवर नजर टाकली असता, सरासरी प्रत्येक महिन्यात २५ अपघात झाले आहेत़ याचाच अर्थ दररोज सरासरी एक अपघात होत आहे़ वाढलेले अपघात चिंतेची बाब असून,  अपघात कमी करण्यासाठी सामाजिक संस्था, पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुढाकार घेवून वाहनधारकांमध्ये जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे़ 

सुसाट वेगावर हवे नियंत्रण
राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्ह्यांतर्गत रस्त्यांवर वाहने चालविण्यासाठी वेग मर्यादा निश्चित करून दिली असताना बहुतांश वेळा त्याचे पालन होत नाही़ सुसाट वेगाने वाहने चालविली जातात़ त्यातूनच अपघात होतात़ विशेषत: शहर हद्दीतही हे प्रकार वाढले आहेत़ त्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याची गरज आहे़ 

जिल्ह्यांतर्गत रस्त्यांवरच सर्वाधिक मृत्यू

वर्षभरात झालेल्या अपघातांमध्ये अंतर्गत रस्त्यांवरच सर्वाधिक अपघात झाल्याचे समोर येत आहे़ १३० अपघात अंतर्गत रस्त्यावर झाले आहेत़ त्यामध्ये ४२ अपघातात ४४ जणांचा मृत्यू झाला आहे़ तर राष्ट्रीय महामार्गावर ७३ अपघात झाले असून, त्यापैकी २३ अपघातांमध्ये २४ जणांचा मृत्यू झाला आहे़ राज्य महामार्गावर ८८ अपघात झाले असून, त्यातील ३८ अपघातांमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला आहे़ रस्तेनिहाय अपघात आणि त्यातील मृत्यूचे प्रमाण पाहता अंतर्गत रस्त्यांवरच मृत्यूचे प्रमाण अधिक आहे़ जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांची पूर्णत: चाळणी झाली आहे़ एकही मार्ग वाहतूकीयोग्य नाही़ खड्डेमय रस्त्यांमधून वाहने चालविताना खड्डा   चुकविण्याच्या नादात अपघात होतात़ त्यामुळे वाहनधारकांबरोबरच या अपघातांना रस्तेही तेवढेच जबाबदार ठरत आहेत़ 


जूनमध्ये सर्वाधिक अपघात
मागील वर्षाच्या अपघातांचा आढावा घेतला असता, जून महिन्यामध्ये सर्वाधिक ३३ अपघात झाले असून, त्यात १६ जणांचा मृत्यू झाला तर २३ जणांना गंभीर स्वरुपाची इजा झाली आहे़ जानेवारी महिन्यात २८ अपघात झाले असून, त्यामध्ये ९ जणांचा मृत्यू तर २७ जण गंभीर जखमी झाले़ फेब्रुवारी महिन्यात २० अपघात झाले़ त्यामध्ये ७ मृत्यू आणि २० जण जखमी झाले आहेत़ मार्च महिन्यात २८ अपघातांमध्ये ११ मृत्यू, १८ जखमी, एप्रिल ३० अपघातात १४ मृत्यू, २२ जखमी़ मे महिन्यात १८ अपघातात ५ मृत्यू, १३ जखमी़ जुलै २५ अपघात ९ मृत्यू, १९ जखमी़ आॅगस्ट ९ अपघात ३ मृत्यू, ६ जखमी़ सप्टेंबर १७ अपघात ४ मृत्यू, १६ जखमी झाले आहेत़  आॅक्टोबर १७ अपघात ८ मृत्यू, १० जखमी़ नोव्हेंबर २२ अपघात १४ मृत्यू, ९ जखमी़ तर डिसेंबर महिन्यात २७ अपघात झाले असून, त्यात ८ जणांचा मृत्यू तर २६ जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

नियम पाळा अपघात टळेल
जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या प्रश्नांवर येथील वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्याशी चर्चा केली असता, ते म्हणाले, वाहतुकीचे नियम पाळले तर निश्चित अपघात कमी होतील़ त्यामुळे वाहनधारकांनी प्राधान्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे़ चार चाकी गाडी चालविताना सिट बेल्ट लावणे बंधनकारक आहे़ तर दुचाकी वाहने चालविताना हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे़ या शिवाय अनेक वाहनधारक मद्य सेवन करून वाहने चालवितात़ त्यामुळेही अपघात वाढत आहेत़ मद्य सेवन करून वाहन चालविणे गुन्हा तर ठरतोच शिवाय वाहनधारकांच्या जीवासाठीही धोक्याचे ठरते़ त्यामुळे मद्यसेवन करून वाहने चालवू नये, असे सरोदे यांनी सांगितले़.

Web Title: Three persons die in accident in Parbhani district during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.