परभणी जिल्ह्यातील तीन तालुक्यात झाल्या विषय समिती सभापतींच्या निवडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 08:01 PM2018-01-22T20:01:10+5:302018-01-22T20:01:30+5:30
गंगाखेड, सोनपेठ आणि मानवत नगरपालिकेतील विषय समित्या आणि स्थायी समित्यांच्या निवडी शनिवारी पार पडल्या.
परभणी : गंगाखेड, सोनपेठ आणि मानवत नगरपालिकेतील विषय समित्या आणि स्थायी समित्यांच्या निवडी शनिवारी पार पडल्या.
गंगाखेड न.प. सभागृहात शनिवारी प्रभारी उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका स्मिता भालेराव यांची निवड करण्यात आली.
स्वच्छता व वैद्यकीय समिती सभापतीपदी काँग्रेसचे शेख इस्माईल शेख हुसेन, पाणीपुरवठा व जलनिसारण समितीच्या सभापतीपदी नगरसेविका शेख तलत मुस्तफा, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या विमलबाई घोबाळे, शिक्षण समिती सभापतीपदी काँग्रेसच्या नगरसेविका मनिषा मस्के यांची निवड करण्यात आली. तर महिला व बालकल्याणच्या उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सावित्रीबाई गुडे यांची निवड करण्यात आली.
नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी रासपाचे उपनगराध्यक्ष राधाकिशन शिंदे यांची तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीच्या सदस्यपदी काँग्रेसचे नगरसेवक गोपीनाथ लव्हाळे, नगरसेविका राजश्री दामा, ज्योती चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला.
मुख्याधिकारी नानासाहेब कामटे यांनी आभार मानले. नगरपरिषद निवडणूक विभागाचे वसंतराव लोंढे, अनिल समिंद्रे यांनी सहकार्य केले. या प्रक्रियेमध्ये काँग्रेसकडे ३, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे १ सभापतीपद तर १ उपसभापतीपद मिळाले आहे. रासपा, भाजपा व अपक्षांकडे प्रत्येकी एक सभापतीपद आले आहे. यावेळी सर्व नगरसेवकांची उपस्थिती होती.
मानवत न.प.त सर्वच गटांना संधी
मानवत येथील नगरपालिकेच्या सभागृहात २० जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी सूचिता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषय समिती सदस्य सभापतीपदाची निवड करण्यात आली. येथील नगरपालिकेवर डॉ.अंकुश लाड गटाची एकहाती सत्ता आहे.
नगराध्यक्षपद शिवसेनेकडे असून काँग्रेसचे ९ नगरसेवक पालिकेमध्ये आहेत. गतवर्षी विषय समितीवर स्वाती कत्रुवार, सारिका खरात, अॅड.किरण बारहाते, सुनिता कुमावत यांची वर्णी लागली होती. हे सर्व नगरसेवक शिवसेनेचे होते. मात्र यावर्षी विषय समिती निवडताना स्थानिक नेते डॉ.अंकुश लाड यांनी प्रमुख विरोधी पक्ष नेते असलेल्या काँग्रेस पक्षाचे गटनेते अ.रहीम अ.करीम यांना सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी तर शैलेजा बारहाते यांना महिला, बालकल्याण सभापतीपदी संधी देत विरोधकांशी जुळवून घेतले. त्यामुळे शहरातील मतदारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
साधारणपणे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांना विविध समितीवर संधी देण्यात येते. मात्र काँग्रेसच्या नगरसेवकांची निवड झाल्याने काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याच्या चर्चेला शहरामध्ये राजकीय वर्तूळात उधाण आले आहे. विरोधी पक्षातील नगरसेवकांनाच संधी दिल्याने विरोधकांची तलवार म्यान झाली की काय, अशी चर्चा होत आहे. नियोजन विकास समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या उपाध्यक्षा राणी लाड, पाणीपुरवठा सभापतीपदी दत्ता चौधरी, सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी मीरा लाड यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पक्षाचा विचार न करता शहराच्या विकासासाठी विषय समिती निवडताना अनुभवी सदस्यांना संधी देण्यात आल्याची माहिती डॉ.अंकुश लाड यांनी दिली.
सोनपेठ येथेही निवड
सोनपेठ- येथील नगरपालिकेच्या सभागृहात २० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासन अधिकारी म्हणून जीवराज डापकर यांनी काम पाहिले. यावेळी स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा जिजाबाई चंद्रकांत राठोड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी खुरेशी जुलेखाबी अ.जीलानी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपसभापतीपदी आशाबाई घुगे तर सदस्यपदी कांताबाई कांदे, चंद्रकला तिरमले (बनसोडे), सुवर्णा बर्वे यांची निवड झाली.
स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्षा जिजाबाई राठोड तर सदस्यपदी उपनगराध्यक्ष दत्तात्रय कदम, खरेशी जुलेखाबी अ.जिलानी, चंद्रकांत राठोड, निलेश राठोड, श्रीकांत भोसले यांची निवड झाली आहे. लेखापाल छगन मिसाळ, कार्यालयीन अधीक्षक नागनाथ कोठुळे यांनी सहकार्य केले.