पोक्सो अंतर्गत आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी, परभणी जिल्हा न्यायालयाचा निकाल
By राजन मगरुळकर | Published: January 30, 2024 06:47 PM2024-01-30T18:47:38+5:302024-01-30T18:48:02+5:30
परभणीतील कोतवाली पोलीस ठाण्यात दोन फेब्रुवारी २०२० मध्ये दाखल झाला होता गुन्हा
परभणी : लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण पोक्सो अधिनियम नुसार एका आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सोमवारी दिला.
परभणीतील कोतवाली पोलीस ठाण्यात दोन फेब्रुवारी २०२० मध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून फिर्यादीच्या मुलीवर आरोपीने लैंगिक हल्ला केल्याचे नमूद केले होते. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस.एस.केंद्रे यांनी केला. सखोल तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावे जमा करून न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.
परभणी जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्वर यांच्या न्यायालयाने सोमवारी पोक्सो कायद्यानुसार आरोपी शेख अतिक शेख कादर (रा.क्रांतीनगर, परभणी) यास तीन वर्षे शिक्षा व दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली आहे. खटल्यात पोलीस अधीक्षक रागसुधा. आर. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, पोलीस कर्मचारी शंभूदेव कातकडे, वंदना आदोडे यांनी काम पाहिले. सरकारी अभियोक्ता म्हणून अभिलाषा पाचपोर यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.