परभणीत रंगला कुस्त्यांचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:18 AM2018-02-05T00:18:48+5:302018-02-05T00:18:57+5:30
जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माजी खा़प्रा़ अशोकराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत चुरशीचे कुस्ती सामने पार पडले़ जिल्हाभरातील हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत कुस्त्यांचा थरार रात्री उशिरापर्यंत रंगत गेला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माजी खा़प्रा़ अशोकराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत चुरशीचे कुस्ती सामने पार पडले़ जिल्हाभरातील हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत कुस्त्यांचा थरार रात्री उशिरापर्यंत रंगत गेला़
माजी खा़अशोकराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सहा वर्षांपासून या स्पर्धा घेतल्या जात आहेत़ यंदाचे हे सातवे वर्षे असून, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास स्पर्धला प्रारंभ झाला़ उपमहापौर माजू लाला यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले़ यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख, नगरसेवक गुलमीर खान, श्रीकांत विटेकर, आंतरराष्ट्रीय पंच बंकट यादव, आयोजक रविराज देशमुख आदींची उपस्थिती होती़ स्पर्धेसाठी लाल मातीचा आखाडा तयार करण्यात आला होता. प्रकाशझोतात ही स्पर्धा खेळविली जात असून, सायंकाळी स्पर्धा पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक जिंतूर रोडवरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर दाखल झाले होते़
महाराष्ट्रातील नामवंत आखाड्यातील मल्ल परभणीत दाखल झाले होते. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, कुर्डूवाडी आदी ठिकाणाहून स्पर्धक आले होते. राजस्तरासाठी १६ तर मराठवाडास्तरासाठी ३२ पहेलवान आणि खुल्या गटासाठी असे २५० पहेलवान सहभागी झाले होते. स्पर्धा पाहण्यासाठी परभणी जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती. प्रेक्षकांसाठी १२ पायºयांची गॅलरी बनविली होती.
या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील शासकीय व प्रशासकीय अधिकाºयांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंतांनी भेटी दिल्या़ शंकरअण्णा पुजारी यांच्या समालोचनामुळे स्पर्धेत मोठी रंगत निर्माण झाली होती. ओघवत्या शैलीतील कुस्ती स्पर्धेचे समालोचन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे पहावयास मिळाले. कोल्हापूर येथील राजू आवळे यांचा पुतण्या रणवीर आवळे व संचाने हलगी, ढोलक, तयताळ व तुतारी या वाद्यांनी स्पर्धेच्या उत्साहात भर घातली.
या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या ६० बाय ६० चौरस फुटाचा लाल मातीचा आखाडा तयार केला होता. या आखाड्यावर स्पर्धा खेळविण्यात आली.
गोकूळ आवारे, सागर बिराजदार यांच्यात अंतीम लढत
नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या निकाली कुस्ती स्पर्धेत रात्री १०़३० वाजता मराठवाडास्तरावरील अंतीम सामन्याला सुरुवात झाली तर या सामान्यानंतर राज्यस्तरासाठीचा अंतीम सामना खेळविला जाणार असल्याने रात्री उशिरापर्यंत या स्पर्धा चालल्या़
मराठवाडास्तरासाठी पुणे येथील काका पवार तालीम संघाचा पहेलवान गोकूळ आवारे आणि पुणे येथीलच गोकूळ वस्ताद तालीम संघाचा पहेलवान सागर बिराजदार यांच्यात अंतीम सामना खेळविण्यात आला़ तर राज्यस्तरासाठी पुणे येथील काका पवार तालीम संघाचा ज्ञानेश्वर गोचडे आणि मामासाहेब लोहळ तालीम संघाचा खेळाडू अक्षय शिंदे यांच्यात अंतीम सामना खेळविण्यात येणार होता़
तत्पूर्वी ५५ किलो वजन गटामध्ये परभणीचा राजेश कोल्हे प्रथम तर बीडचा दयानंद सलगर द्वितीय आला़ साठ किलो वजन गटात कोल्हापूर येथील भारत पाटील याने प्रथम तर लातूर येथील महेश सातपुते याने द्वितीय क्रमांक पटकावला़ ७६ किलो वजन गटामध्ये लातूरच्या विष्णू सातपुते याने प्रथम तर परभणीच्या सोमनाथ श्रीखंडे याने द्वितीय क्रमांक मिळविला़
६७ किलो वजन गटात कोल्हापूर येथील हृदयनाथ पाचकुटे याने प्रथम तर परभणीचा पहेलवान अर्जुन डिघोळे याने द्वितीय क्रमांक मिळविला़ या स्पर्धेचा अंतीम निकाल रात्री उशिरापर्यंत हाती आला नाही़ स्पर्धेसाठी राज्यभरातून दाखलेल्या खेळाडुंना परभणीकर क्रीडा रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत स्पर्धेतील रंगत वाढविली़