तस्करांचा थरारक पाठलाग; ग्रामस्थांच्या सहकार्याने सव्वा दोन क्विंटल गांजा जप्त, दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 03:08 PM2021-09-10T15:08:26+5:302021-09-10T15:09:06+5:30
चालकाने भरधाव वेगाने कार पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरातून सेलू रस्त्याकडे वळवली.
पाथरी ( परभणी ) : पेट्रोलिंगवर असलेले पाथरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी यांनी पाथरी-सेलू रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका संशयास्पद कारचा पाठलाग केला. बोरंगव्हानजवळ ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी कार अडवली. यात ११ लाख रुपये किंमतीचा २ क्विंटल २६ किलो गांजा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे तर एक जण फरार झाला आहे. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा पकडण्याची पोलीस कारवाई पहिल्यांदाच झाली आहे.
गणपती स्थापनेच्या अनुषंगाने गुरुवारी रात्री ११ वाजेपासून पाथरी शहरात पोलिसांची गस्त सुरु होती. सहायक पोलीस निरीक्षक आणि चालक यांची पेट्रोलिंग सेलू उपविभागात होती. पहाटे ३ वाजेच्या सुमारास परभणीकडून एक कार पाथरी कडे आली. चालकाने भरधाव वेगाने कार पाथरी शहरातील सेलू कॉर्नर परिसरातून सेलू रस्त्याकडे वळवली. ही संशयास्पद बाब गस्तीवर असणारे सहायक पोलिस निरीक्षक सोमवंशी यांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच कारचा पाठलाग सुरू केला. कार वेगाने पुढे जात बोरंगव्हानकडे गेली. येथे ग्रामस्थांना चोर आल्याचा संशय आल्याने त्यांनी कार अडवली. काही वेळात पोलिसांची गाडी दाखल झाली.
ग्रामस्थांच्या मदतीने गाडीतील एक महिला आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. एक जण मात्र फरार झाला. मारोती रामराव बोलेगावे ( सिरसदेवी ता. गेवराई. जि. बीड ) आणि शिला संतोष राहाडे ( रुही ता. गेवराई जि. बीड ) असे आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गाडीची ( क्र एम एच 03 बी सी 5032 ) तपासणी केली असता त्यात गांज्याने भरलेल्या गोण्या आढळून आल्या. शुक्रवारी सकाळी १० वाजता पोलिसांनी पंचनामा केला. ७ लाख रुपये किंमतीची गाडी, ११ लाख ३० हजार ५२५ रुपयांचा २ क्विंटल २६ किलो १५ ग्राम गांजा आढळून आला. यावेळी पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी , पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव दलालवाड यांची उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा पकडण्याची पाथरी पोलिसांची पहिलीच कारवाई आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोमवंशी यांनी गाडीचा थरारकरित्या पाठलाग करून कारवाई केल्याने त्यांचे स्वागत होत आहे .