थरारक ! पुरात वाहून आलेल्या कारची काच फोडून नागरिकांनी चालकाला वाचवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:25 PM2021-07-12T16:25:21+5:302021-07-12T16:29:18+5:30
पुलाच्या बांधकामास गाडी अडकल्यानंतर काही नागरिकांनी जीवाची पर्वा न तिकडे धाव घेतली.
पाथरी : राज्य महामार्ग- ६१ वर हदगाव ( बु ) गावाजवळ बांधकाम सुरू असलेल्या पुलास पुरात वाहून आलेली एक कार अडकली. प्रसंगावधान राखून नागरिकांनी कारची मागील काच फोडून चालकाला वाचवल्याने त्याचे प्राण वाचले. पूर आलेला असताना नागरिकांनी स्व: च्या जीवाची पर्वा न करता एकाचे प्राण वाचविल्याची ही थरारक घटना रविवारी ( दि. ११) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य मार्ग 61 च्या आष्टी - पाथरी या रस्त्याचे काम सध्या पाथरी भागात सुरू आहे. हदगाव ( बु ) गावाजवळ याच रस्त्यावर दोन पुलाचे बांधकाम ही सुरू आहे. पुलातून या भागातील ओढ्या नाल्याचे पाणी वाहते. रविवारी ( दि. ११) सायंकाळी या भागात चांगला पाऊस पडल्याने रात्रीच्या वेळी हदगाव ( बु ) गावाजवळ असणाऱ्या पुलाला पाणी आले. त्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या वळण रस्त्यावर ही मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. दरम्यान, रात्री ९ वाजेच्या सुमारास पाथरी तालुक्यातील मरडसगाव श्रीरामपूर वस्ती येथील रहिवासी रंगुनाथ दत्तू मुंढे हे आपली कार ( एम एच 12 बी एस 7885 ) ने पाथरीहून गावाकडे जात होते. वळण रस्त्यावरील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांची गाडी पुढे वाहत गेली. हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला.
वेगवान प्रवाहाने गाडी उलटली होती. तसेच पाण्याची पातळी वाढत जात होती. या परिस्थितीमध्ये मुंढे गाडीतच अडकले. त्यांची बाहेर पडण्याची धरपड सुरु होती. दरम्यान, वाहत जाणाऱ्या गाडीचा काही नागरिकांनी पाठलाग केला. पुढे पुलाच्या बांधकामास गाडी अडकल्यानंतर काही नागरिकांनी जीवाची पर्वा न तिकडे धाव घेतली. काहींनी प्रसंगावधान राखून तत्काळ गाडीची मागची काच दगडाने फोडली. यानंतर मुंढे यांना नागरिकांनी गाडीमधून सुखरूप बाहेर काढले.