थरारक! पिस्तुलाच्या धाकावर पेट्रोल पंपावरील एक लाख रुपये लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 02:05 PM2022-03-11T14:05:10+5:302022-03-11T14:05:59+5:30
स्पोर्ट बाईकवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तिघांनी लुटले
मानवत : रूढी शिवारात असलेल्या कैलास पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून एक लाख रुपये लुटल्याची घटना 10 मार्च रोजी रात्री 11वाजता घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पाथरी-परभणी रस्त्यावर रूढी पाटी जवळ कैलास पेट्रोल पंप आहे. 10 मार्च रोजी रात्री भीमाशंकर दळवे आणि दत्ता भिसे हे दोन कर्मचारी कर्तव्यावर होते. रात्री 11 वाजता हे दोघे जेवण करत असताना एक टेम्पो डिझेल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर मशीन क्रमांक 1 वर आला होता. मशीनवर दळवे गेले असता यावेळी लाल रंगाच्या स्पोर्ट बाईकवर तीन इसम तोंडाला रुमाल बांधून आले. तिघेही मशीन क्रमांक 1 वरील टेम्पोच्या पाठीमागे उभे राहिले.
टेम्पो गेल्यानंतर दुचाकीवरील दोघे जण खाली उतरले. त्यातील एकाने भीमाशंकर दळवे यांच्या पोटाला पिस्तुल लावत १ लाख रुपये काढून घेतले. रक्कम लुटल्यानंतर तिघे जण मोटार सायकलवर बसून परभणीकडे निघून गेले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने दहशत पसरली आहे. भीमाशंकर दळवे यांच्या तक्रारीवरून या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश गिरी हे करत आहेत.