थरारक! सिग्नलचे वायर तोडली, रेल्वे थांबताच चोरट्यांनी महिला प्रवाशांना लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 12:24 PM2024-10-03T12:24:00+5:302024-10-03T12:24:32+5:30
गंगाखेड-वडगाव स्टेशन दरम्यान नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसमधील प्रकार
- अनिल शेटे
गंगाखेड (जि.परभणी) : गंगाखेड ते वडगाव स्टेशन दरम्यान वडगाव स्टेशनजवळ रेल्वे सिग्नलचे वायर चोरट्यांनी तोडल्याने नागपूर-कोल्हापूर रेल्वे सिग्नलजवळ थांबली. यावेळी चोरट्यांनी रेल्वेतील चार महिला प्रवाशांची एकूण २३ ग्रॅम सोन्याचे दागिने लुटल्याची घटना २ ऑक्टोबरला पहाटे २ वाजता घडली. याप्रकरणी परळी रेल्वे पोलिस ठाण्यात प्रवाशांनी तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रेल्वे क्रं (११४०३) नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस गंगाखेड रेल्वेस्थानक ते वडगाव स्टेशन दरम्यान वडगाव स्थानकाजवळील रेल्वे सिग्नल मिळाले नसल्याने सिग्नल जवळ थांबली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडला. चोरट्यांनी सिग्नलचे तार तोडले होते, तसेच कॉलिंगचे वायर तोडले होते. यामुळे रेल्वे सिग्नलजवळ थांबताच चोरट्याने काही रेल्वे डब्यात प्रवेश केला. दरम्यान, रेल्वे सिग्नलजवळ का थांबली म्हणून वडगाव स्टेशनचे कर्मचारी सिग्नलकडे निघाले होते. याच वेळी चोरट्यांनी प्रवासी डब्यातील चार महिलांचे सोन्याचे दागिने लांबविले. यात तीन महिला प्रवाशांच्या गळ्यातील पाच-पाच ग्रॅमचे असे मिळून १५ ग्रॅम सोन्याचे दागिने पळवले तर एका महिला प्रवाशाचे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने पळवले. एकूण चार महिला प्रवाशांचे मिळून २३ ग्रॅम सोन्याचे दागिने पळवले.
याप्रकरणी परळी रेल्वे ठाण्यात महिला प्रवाशांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. वडगाव स्टेशन रेल्वेस्थानक कर्मचाऱ्यांनी चोरट्याने सिग्नलचे तार तोडलेल्या ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करून सिग्नल सुरू केले. त्यानंतर नागपुर-कोल्हापूर रेल्वे परळीकडे निघाली. घडलेली घटना परळी रेल्वे पोलिस ठाण्यात समजताच चोरट्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तैनात केले आहे. सिग्नल दुरुस्ती व पाहणीसाठी नांदेड येथून वडगाव स्टेशनला बुधवारी पथक आले होते.