flood : थरारक ! पुरात वाहून जाणाऱ्या पाच जणांचे गावकऱ्यांनी वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 12:20 PM2021-10-18T12:20:08+5:302021-10-18T12:22:25+5:30
flood : फाल्गुना नदीच्या मधोमध प्रवाहमध्ये ट्रॅक्टर आले असता पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीमध्ये हे पाच जण वाहत जात होते.
शेळगाव ( परभणी ) : सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ते उक्कडगाव रस्त्यावर फाल्गुनी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या पाच जणांना वाचविण्यात गावकऱ्यांना ( Villagers rescue five flood victims) यश आले आहे. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
सोनपेठ तालुक्यात रविवारी रात्री सोनपेठ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेळगाव ते उक्कडगाव रस्त्यावरील फाल्गुनी नदीलापूर आला होता. १८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शिवाजी सर्जेराव अडागळे (रा.भोगलवाडी ता.धारुर) हे साखर कारखान्यावर काम करण्यासाठी मजूर आणण्यासाठी जात होते. एम.एच.२२/एच.पी. ७८२४ या क्रमांकाचे ट्रॅक्टर घेऊन ते तालुक्यातील गंगापिंपरी येथे पोहोचले. यावेळी फाल्गुनी नदीला पूर आला होता. नदी पार करुन पैल तिरावर जाण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर नदीपात्रातून पुढे नेण्यास सुरुवात केली. यावेळी ट्रॅक्टरमध्ये गणेश राजेभाऊ कांबळे (२४, रा.शेळगाव), विकास शिवाजी उफाडे (२४, रा. गंगापिंपरी), दीपक गुलाब कदम व बाबासाहेब मदनराल कदम (रा.थडी पिंपळगाव) हे सर्व जण त्यांची दुचाकी ट्रॅक्टरमध्ये टाकून गावाकडे जाण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये बसले होते. फाल्गुना नदीच्या मधोमध प्रवाहमध्ये हे ट्रॅक्टर आले असता पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदीमध्ये हे पाच जण वाहत जात होते. वाहून जाणाऱ्या पाच जणांनी आरडा-ओरड केला.
यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेले बाबा गायकवाड यांनी हा प्रसंग पाहिला. त्यांनी बचावकार्यासाठी गावातील काही ग्रामस्थांना बोलावून घेतले. बाबा गायकवाड, कचरुबा कांबळे, बळीराम कांबळे, विष्णू गायकवाड, अभयराव देशमुख, पोलीस पाटील सुनील गोेरे, भगवान गोरे, अण्णासाहेब बागवाले, भानुदास तळेकर, सोहेल शेख, समीर शेख, अशफाक पठाण, इरफान पठाण, प्रकाश गायाकवाड आदींनी घटनास्थळी जाऊन स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पाच जणांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर अजितराव देशमुख व पोलीस पाटील सुनील गोरे यांनी ही माहिती पोलीस ठाण्याला दिली. पोलीस निरीक्षक काकडे, बिट जमादार आडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पुराच्या पाण्यातून वाचविलेल्या पाचही जण सुखरुप आहेत.