थरार ! गंगाखेड येथील शेत आखाड्यांवर चोरट्यांचा धुमाकूळ ; १ जन गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:14 PM2017-10-27T12:14:44+5:302017-10-27T12:21:39+5:30
परळी रोडवरील समद जिनिंगच्या पाठीमागील विनायक महाजन यांच्या शेत आखाड्यावर गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास ५ चोरट्यांनी तीन आखाड्यांवर धुमाकूळ घातला.
गंगाखेड ( परभणी ) : परळी रोडवरील समद जिनिंगच्या पाठीमागील विनायक महाजन यांच्या शेत आखाड्यावर गुरुवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास ५ चोरट्यांनी तीन आखाड्यांवर धुमाकूळ घातला. चोरट्यांनी तिघांना मारहाण केली असून, त्यातील एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत माहिती अशी की, २६ आॅक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आखाड्यावरील बबन मोरे यांना मारहाण करण्यात आली. मोरे यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलविण्यासाठी धाव घेतली असता चोरट्यांनी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई मोरे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओढून घेतली. बबन मोरे यांचा मुलगा आकाश मोरे यास चाकू लावून ‘पैसे कुठे आहेत, पैसे द्या’, असे म्हणत मारहाण केली. जखमी आकाश व त्याच्या आईने चोरांना हिसका मारून घरात धाव घेतली. चोरट्यांनी घरातील सामान अस्तव्यस्त फेकले व आपला मोर्चा दुस-या आखाड्याकडे वळविला. यावेळी बाजुच्या आखाड्यावरुन काही जण आल्यानंतर जखमी आकाशला गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर चोरट्यांनी संत जनाबाई मंदिर कमानीजवळील लव्हाळे यांच्या आखाड्यावरील विष्णू सोळंके, बालाजी डहाळे यांचा गडी एकनाथ यांनाही मारहाण केली. ही माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे, राहुल बहुरे, रवि मुंडे, पोलीस कर्मचारी प्रदीप सपकाळ, प्रल्हाद मुंडे, सुग्रीव कांदे, बळीराम करवर, नरसिंग शेल्लाळे, श्रीकृष्णा तंबुर आदी कर्मचा-यांनी पप्पू मोटे, प्रकाश लव्हाळे, गोलू चायल, गजानन डहाळे, किरण जोशी, वैभव भोसले, भगवान लव्हाळे, विष्णु सोळंके आदी नागरिकांच्या मदतीने रात्रीच्या वेळी परळी रोड, महातपुरी, भांबरवाडी शिवार, परभणी रोड, शहराजवळील जनाबाई मंदिराच्या पाठीमागील परिसर पिंजून काढला. मात्र चोरटे सापडले नाहीत.