उपनिबंधकांच्या कक्षात उधळली तूर; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 04:39 PM2018-05-14T16:39:30+5:302018-05-14T16:39:30+5:30
साठवणुकीसाठी जागा नसल्याच्या कारणावरून तूर खरेदी करण्यास उदासिन असलेल्या प्रशासनाविरूद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले.
परभणी : साठवणुकीसाठी जागा नसल्याच्या कारणावरून तूर खरेदी करण्यास उदासिन असलेल्या प्रशासनाविरूद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. दरम्यान दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या कक्षात आंदोलकांनी तूर उधळून संताप व्यक्त केला. तूर खरेदीला मुदतवाढ मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला़
परभणी जिल्ह्यात नाफेडमार्फत हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांकडील तूर आणि हरभरा हमीभावाने खरेदी केला जात आहे़ सुरुवातीपासूनच खरेदीचा वेग मंद असल्याने मोठ्या प्रमाणात तूर, हरभरा खरेदी होणे बाकी आहे़ सुमारे १७ हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली असताना केवळ ४ हजार शेतकऱ्यांचीच तूर खरेदी झाली आहे़ तूर साठवणुकीसाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण सांगत तुरीची खरेदी होत नाही़ त्यातच १५ मे रोजी हे खरेदी केंद्र बंद होणार आहे़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात तूर खरेदीअभावी शिल्लक आहे़ खुल्या बाजारात या तुरीला भाव मिळणार नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठले़ तुरीचे पोते घेऊन कार्यकर्ते या कार्यालयात दाखल झाले़ यावेळी जिल्हा उपनिबंधक पुरी उपस्थित नव्हते़ संतप्त झालेल्या शेतकरी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेली तूर उपनिबंधकांच्या कक्षात उधळून आपला रोष व्यक्त केला़ यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष माणिकराव कदम, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, रामेश्वर आवरगंड, भगवान शिंदे, केशव आरमळ, रसिका ढगे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते़
जिल्हा प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक आहे़ कृषी विद्यापीठात मतपेट्या ठेवण्यासाठी जागा भेटू शकते तर तूर साठवणुकीसाठी का मिळत नाही? असा सवाल जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी उपस्थित केला़ तूर खरेदीला मुदतवाढ मिळाली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला़