प्राणांतिक अपघात रोखण्यास चंद्रपूर पॅटर्न जिल्ह्यात राबविणार; नूतन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी पदभार स्वीकारला

By राजन मगरुळकर | Published: February 4, 2024 04:56 PM2024-02-04T16:56:00+5:302024-02-04T16:58:07+5:30

सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या समस्या, प्रश्न थेट पोलिसांकडे मांडाव्यात, त्यांचे निराकरण केले जाईल, असा विश्वास नुतन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी व्यक्त केला.

To prevent fatal accidents, Chandrapur pattern will be implemented in the district; New Superintendent of Police Ravindra Singh Pardeshi assumed charge | प्राणांतिक अपघात रोखण्यास चंद्रपूर पॅटर्न जिल्ह्यात राबविणार; नूतन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी पदभार स्वीकारला

प्राणांतिक अपघात रोखण्यास चंद्रपूर पॅटर्न जिल्ह्यात राबविणार; नूतन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी पदभार स्वीकारला

परभणी : जिल्ह्यातील रस्ते अपघात आणि प्राणांतिक अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी चंद्रपूर येथे राबविलेल्या पॅटर्नचा उपयोग करणार आहे. लोकाभिमुख पोलीस प्रशासन राबविण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या समस्या, प्रश्न थेट पोलिसांकडे मांडाव्यात, त्यांचे निराकरण केले जाईल, असा विश्वास नुतन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी व्यक्त केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रवींद्रसिंग परदेशी यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रविवारी पदभार स्वीकारला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. रवींद्रसिंग परदेशी हे चंद्रपूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. परभणीच्या मावळत्या पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांची बदली बृह्नमुंबई येथे झाल्यानंतर त्याच बदली आदेशामध्ये रवींद्रसिंग परदेशी यांची परभणीत पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. शनिवारी मध्यरात्री रवींद्रसिंग परदेशी हे परभणी शहरात दाखल झाले. यानंतर रविवारी त्यांनी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला. याप्रसंगी पोलीस दलाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस उपाधीक्षक मुख्यालय सुभाष अनमूलवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले, राज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी व हे अपघात कमी करण्यास विशेष प्राधान्य दिले. यामुळे राज्यातून चंद्रपूर हे दुसऱ्या स्थानी होते. परभणी जिल्ह्यातील रस्ते अपघात, सोबतच सर्वसामान्यांचे प्रश्न समस्या यासाठी लोकाभिमुख पोलीस प्रशासन राबविणार आहे. आजच पदभार स्विकारला आहे, त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बाबींची माहिती घेऊन त्या दृष्टीने पुढील वाटचाल असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर येथील प्राणांतिक अपघात रोखण्यासाठीचा पॅटर्न परभणी जिल्ह्यातही राबवून रस्ते अपघात कमी करण्याचे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

ठाणेदारांची घेतली आढावा बैठक -
रविवारी सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील बैठक कक्षामध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखा विविध प्रमुख शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून जिल्ह्यातील विविध बाबींचा आढावा घेतला. या बैठकीत सध्या सुरू असलेल्या ऊरुस यात्रा सोबतच इतर सण उत्सव आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती त्यांनी ठाणेदारांकडून, अधिकाऱ्यांकडून घेतली. सर्व ठाणेदारांना बैठकीत त्यांनी सूचना देत ओळख करून घेतली.
 

Web Title: To prevent fatal accidents, Chandrapur pattern will be implemented in the district; New Superintendent of Police Ravindra Singh Pardeshi assumed charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.