पालममध्ये डीडीसाठी बँकांकडून टोलवाटोलवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:22 AM2021-09-17T04:22:44+5:302021-09-17T04:22:44+5:30
स्टेट बँक ऑफ हैदराबादचे विलिनीकरण भारतीय स्टेट बँकेत केल्याने राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखांची संख्या तीनवरून दोनवर आली. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांची संख्यादेखील ...
स्टेट बँक ऑफ हैदराबादचे विलिनीकरण भारतीय स्टेट बँकेत केल्याने राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखांची संख्या तीनवरून दोनवर आली. त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांची संख्यादेखील घटली. त्याचा फटका ग्राहकांना सोसावा लागतोय. सध्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेकडून डीडी काढला जात नाही. अत्यावश्यक काम असले तरीही स्टेट बँकेकडून नकार दिला जातो. कारण विचारल्यास खोटे बोलून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्याची प्रचिती एस.आर. बने यांना दुसऱ्यांदा आली. त्यांनी ६ सप्टेंबरला स्टेट बँकेत डीडी काढला होता. तो वेळेत पोहोचेल, हा विश्वास फोल ठरला. १५ सप्टेंबरपर्यंत डीडी जमा झाला नाही. त्याची विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे बँकेकडून मिळाली. शासकीय नोकरीचा अर्ज भरण्यासाठी गेलेल्या अर्जदाराचे नातेवाईक सुधाकर हनवते यांनाही टोलवाटोलवी करण्यात आली. कर्मचाऱ्यांकडून-शाखाधिकाऱ्यांकडे आणि शाखाधिकाऱ्यांकडून-कर्मचाऱ्यांकडे त्यांना पाठविण्यात आले. तरीही डीडी न देण्याचे कारण विचारल्यानंतर खुद्द शाखाधिकारी विजयकुमार वर्मा यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना विचारा, तेच सांगतील, असे म्हणून जबाबदारी झटकली. तत्पूर्वी केबिनचा दरवाजा बंद करून ते काम करत होते. दुसरीकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेतही डीडी दिला जात नाही. त्याचे कारण प्रिंटर नसल्याचे सांगण्यात आले. प्रिंटर अभावी काढलेल्या डीडीची प्रिंट देता येत नाही म्हणून ग्रामीण बँकही डीडी टाळत आहे.
आठ दिवसांनंतरही डिडी पोहोचला नाही. त्याची विचारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांपर्यंत गर्दीमुळे जाता येत नाही. शाखाधिकारी तर दरवाजा बंद करून बसलेत. जेव्हापासून मागील शाखाधिकाऱ्यांची बदली झाली. तेव्हापासून भारतीय स्टेट बँकेत गोंधळ सुरू झाला आहे.
-एस. आर. बने, शिक्षक, पालम.
प्रिंटरअभावी डीडी काढणे बंद आहे. प्रिंटरची मागणी करण्यात आली आहे. तरीही अत्यावश्यकवेळी हस्तलिखित डीडी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
-एस. एस. स्वामी, शाखाधिकारी, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पालम.
डीडीबद्दल माझ्याऐवजी कर्मचाऱ्यांनाच विचारा ते सांगतील. डीडीचे काम तेच करतात.
- विजयकुमार वर्मा, शाखाधिकारी, भारतीय स्टेट बँक, पालम.