आखाड्यावरील कापसासह अवजारे चोरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:17 AM2021-03-05T04:17:52+5:302021-03-05T04:17:52+5:30
परभणी : तालुक्यातील पेडगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील वेचणी करून ठेवलेला १० क्विंटल कापूस व शेती उपयोगी लोखंडी अवजारे ...
परभणी : तालुक्यातील पेडगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील वेचणी करून ठेवलेला १० क्विंटल कापूस व शेती उपयोगी लोखंडी अवजारे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ मार्च रोजी सकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेडगाव येथील शेतकरी सुरेश बालासाहेब देशमुख यांचा गावच्या शेतशिवारात आखाडा आहे. शेतात सालगडी नसल्याने ते स्वत: शेतात काम करतात. त्यांनी १ मार्च रोजी शेतातून काढलेला ५० हजार रुपयांचा कापूस आखाड्यावर एका ठिकाणी ठेवला होता. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते सायंकाळी घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता ते आखाड्यावर आले. यावेळी त्यांना आखाड्यावर ५० हजार रुपयांचा कापूस व २० हजार रुपयांची शेती उपयोगी लोखंडी अवजारे गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी नातेवाईक व मित्रांना शेतात बोलावून घेतले. त्यानंतर शेतात पाहणी केली असता एका वाहनाच्या टायरचे ठसे दिसून आले. याबाबत त्यांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.