सर्व मुलीच जन्मल्यावरून छळ, पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने पतीला ५ वर्षांची सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 06:51 PM2022-10-19T18:51:47+5:302022-10-19T18:52:36+5:30
तुला सर्व मुलीच आहेत, असे म्हणून शारीरिक, मानसिक त्रास दिल्याने पत्नीने केली होती आत्महत्या
गंगाखेड (जि. परभणी) : पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याने आरोपी पतीला पाच वर्षांची सक्तमजुरी आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा गंगाखेड अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एल. डी. गायकवाड यांनी मंगळवारी सुनावली. मुरलीधर बळीराम पांढरे (रा. चोरवड, ता. पालम) असे शिक्षा झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
पालम तालुक्यातील चोरवड येथील विवाहिता रेणुका मुरलीधर पांढरे हिला पती मुरलीधर पांढरे याने दारू पिऊन सतत त्रास दिला. तुला सर्व मुलीच आहेत, असे म्हणून शारीरिक, मानसिक त्रास दिला. घरात वेगवेगळ्या कारणाने भांडण केले. या त्रासाला कंटाळून पत्नी रेणुका हिने आत्महत्या केली. या प्रकरणी मयताच्या आईने १९ नोव्हेंबर २०२० रोजी पालम ठाण्यात मुलीच्या आत्महत्येस जबाबदार धरून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांनी गुन्हा दाखल करून चौकशी केली. गंगाखेड अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणी सहा जणांच्या साक्ष तपासल्या. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करून बाजू न्यायालयासमोर मांडली. साक्षीदार आणि वकिलांचा युक्तिवाद, दोषारोपपत्रातील अहवाल यावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध झाला. यात आरोपी पती मुरलीधर बळीराम पांढरे (रा. चोरवड, ता. पालम) यास पाच वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा आणि १ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एल. डी. गायकवाड यांनी सुनावली. जिल्हा सरकारी अभियोक्ता डि. यू. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी सहायक अभियोक्ता एस. बी. पौळ यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली. त्यांना सरकारी अभियोक्ता एस. डी. वाकोडकर, कोर्ट पैरवी अधिकारी एस. जी. बडे यांनी सहकार्य केले.