परभणी जिल्ह्यात १ हजार ५९४ रुग्ण कर्करोगाच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:45 PM2018-05-31T19:45:42+5:302018-05-31T19:45:42+5:30
तंबाखूच्या अतिसेवनामुळे जिल्ह्यातील १ हजार ५९४ नागरिकांमध्ये कर्करोगाची तीव्र लक्षणे आढळून आली आहेत.
परभणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलेल्या तपासणीत तंबाखूच्या अतिसेवनामुळे जिल्ह्यातील १ हजार ५९४ नागरिकांमध्ये कर्करोगाची तीव्र लक्षणे आढळून आली आहेत.
जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनाच्यानिमित्ताने जिल्ह्यात तंबाखू सेवन करणाऱ्या नागरिकांचा आढावा घेतला असता व्यसनाची पाळेमुळे खोलवर गेल्याचे पहावयास मिळत आहे. तंबाखूच्या अतिसेवनामुळे कर्करोग, -हदयविकार यासारखे आजार जडू शकतात. तंबाखुच्या अती सेवनामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे राज्य शासनाच्या लक्षात आले. यावर उपाय म्हणून महाराष्टÑ शासनाने २०१२ साली राज्यात तंबाखू मिश्रित गुटखा व सुगंधी तंबाखूच्या उत्पादनावर विक्री करण्यासाठी बंदी आणली.
३१ मे रोजी जगभरात तंबाखू सेवन विरोधी दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने तंबाखूचे व्यसन जडलेल्यांना तंबाखू सेवनापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जातात. याच पार्श्वभूमीवर परभणी शहरात तंबाखू विक्रीचा बुधवारी आढावा घेण्यात आला. परभणी शहरात १० ते १५ ठोक विक्रेते असून सुमारे १ हजार पानटपऱ्यावरून दररोज तंबाखूची विक्री होते. तंबाखू सेवन करणाऱ्यांमध्ये युवकांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. साध्या तंबाखूसह मावा, पान, गुटखा, खैनी, सिगारेट, बिडी या माध्यमातून तंबाखूचे सेवन केले जाते.
शहरातील सुमारे १ हजार पानटपऱ्यावरून दररोज १० ते १२ लाख रुपयांची उलाढाल होते. तर तंबाखू विक्रीच्या ठोक व्यापाऱ्यांकडूनही ८ ते १० लाख रुपयांची तंबाखू विक्री होत असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे हा आकडा यापेक्षाही अधिक असू शकतो. परभणी शहरात दररोज साधारण २० लाख रुपयांच्या तंबाखू विक्रीची उलाढाल होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर यामधून होणारे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. या कक्षांमधून तंबाखूच्या अतिसेवनामुळे कर्करोग होण्याची लक्षणे जिल्ह्यातील १ हजार ५९४ नागरिकांमध्ये आढळून आल्याची माहिती मिळाली.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षापासून जिल्ह्यात कर्करोगा संदर्भात तपासणी केली जात आहे. या तपासणीच्या अहवालानुसार १ हजार ५९४ रुग्णांमध्ये कर्करोगाची तीव्र लक्षणे आढळून आली आहेत. या नागरिकांची जिल्हा सामान्य रुग्णालयात तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियमित तपासणी केली जात असल्याचेही येथील जिल्हा सल्लागार श्याम गमे यांनी सांगितले.
६ जणांना झाली कर्करोगाची लागण
गुटखा, सुगंधी तंबाखूचे अतिसेवन केल्यानंतर संबंधित व्यक्तीला कर्करोगाचा धोका होऊ शकतो. जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार १ हजार ५९४ नागरिकांमध्ये कर्करोगाची तीव्र लक्षणे आढळून आली आहेत. तर १ हजार ५९४ नागरिकांमध्ये कर्करोगाची तीव्र लक्षणे आढळून आली
जनजागृतीवर भर देण्याची गरज
परभणी शहरात दररोज गुटखा, सुगंधीत तंबाखुच्या विक्रीतून साधारणत: २० लाखांची उलाढाल होते. दररोजच्या तंबाखू विक्रीचा हा आकडा लक्षात घेता व्यसनाधिनतेचे प्रमाणही स्पष्ट होत आहे. तंबाखू व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी शासकीय पातळीवर जनजागृती करण्याची गरज आहे; परंतु, संबंधितांकडून याकडे दुर्लक्ष करीत कागदोपत्री मोहीम राबविली जात आहे.
तंबाखूसेवनामुळे देशात दरवर्षी १० लाख व्यक्तींचा होतो मृत्यू
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने दरवर्षी जगात ५५ लाख तर भारतात १० लाख नागरिकांचा मृत्यू होतो. तंबाखूमधील अल्कोहोलाईड रसायनात कोटीनाईन, अॅन्टबीन, अॅनाबेसीन अशी रसायने असून भारतीय तंबाखूमध्ये मर्क्युरी, लेड, क्रोमियम, कॅडमियम आदी अतिविषारी रसायने सापडतात. या व्यतिरिक्त तंबाखूच्या धुरात व धुम्रपानात डीडीटी, बुटेन, सायनाईड, अमोनिया आदी रसायने आढळतात. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुफ्फुस, गळा, अन्ननलिका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होतो. तंबाखूच्या सेवनाने त्यातील निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूचे कार्य थांबते. मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. तसेच जे लोक धूम्रपान करतात त्यांना हृदयघात होण्याची शक्यता अधिक असते.