अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:41 AM2021-01-13T04:41:39+5:302021-01-13T04:41:39+5:30
कार्यालयाच्या परिसरात वाढली अस्वच्छता परभणी : येथील प्रशासकीय इमारत भागातील कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता झाली आहे. जागोजागी धूळ ...
कार्यालयाच्या परिसरात वाढली अस्वच्छता
परभणी : येथील प्रशासकीय इमारत भागातील कार्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता झाली आहे. जागोजागी धूळ झाली असून, प्रत्येक कोपऱ्यात गुटखा, पान खाऊन थुंकल्याने हे कोपरे रंगलेले आहेत. या भागात नियमित स्वच्छता केली जात नसल्याने अस्वच्छता वाढली आहे. गुटखा, पान खाऊन थुंकणाऱ्या नागरिकांवरही कारवाई होत नाही. परिणामी हा प्रकार बळावला आहे.
स्टेडियम भागातील खड्डा धोकादायक
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात नालीवरील ढापा गायब झाल्याने हा खड्डा वाहनधारकांसाठी धोकादायक झाला आहे. स्टेडियमच्या प्रवेशद्वारावरच नालीवरील ढापा गायब झाला आहे. त्यामुळे खड्ड्यात अडकून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
पीकविम्याच्या तक्रारींवर कारवाई कधी?
परभणी : जिल्ह्यात पीकविम्याच्या तक्रारींवर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याने विमा कंपनीच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी नुकसानीसंदर्भात ऑफलाइन तक्रार नोंदविली आहे. मात्र कंपनीने त्याची दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे,
‘मुख्यमंत्री ग्रामसडक’ची रखडली कामे
परभणी : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक भागात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याची कामे सुरू केली. मात्र मध्यंतरी कोरोनाच्या संकटामुळे ही कामे ठप्प झाली. आता या कामांसाठी निधी उपलब्ध झाला नसल्याने रखडलेली कामे अद्यापही सुरू केली नाहीत.
अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करा
परभणी : शहरात सार्वजनिक जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. सुरुवातीला किरकोळ अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी आता त्याचे पक्क्या स्वरुपात बांधकाम केले आहे. मात्र मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने अतिक्रमणधारकांचे फावते आहे. तेव्हा शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला वेग
परभणी : ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारासाठीचा कालावधी संपत आल्याने प्रचाराला वेग आला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी भर दिला असून, गावात जागोजागी होर्डिंग्ज, बॅनर लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे प्रचारासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जात आहे. एकंदर ग्रामपंचायत निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील वातावरण तापू लागले आहे.