बेवारस वाहनांमुळे वाहतुकीत अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:19 AM2021-03-09T04:19:50+5:302021-03-09T04:19:50+5:30
परभणी : शहरातील विविध भागात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. वर्षानुवर्षापासून या ...
परभणी : शहरातील विविध भागात रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. वर्षानुवर्षापासून या वाहनांचे मालक वाहनांच्या संदर्भात निर्णय घेत नसल्याने ही वाहने रस्त्याच्या कडेला मागील अनेक वर्षांपासून पडून आहेत.
शहरातील बाजारपेठ भागासह नवीन वसाहतींमधील रस्त्यांवरुन फेरफटका मारला असता रस्त्याच्या कडेने अनेक बेवारस वाहने उभी असल्याचे दिसून येतात. गांधी पार्कातून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वच्छतागृहाच्या शेजारी मागील अनेक वर्षांपासून एक वाहन उभे केले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी पार्किंगची सुविधा असल्याने वाहतुकीला अडथळा होत नसला तरी हे वाहन अनेक वर्षांपासून एकाच जागी उभे आहे. अशीच परिस्थिती शहरातील इतर भागातही पहावयास मिळते. जिल्हा स्टेडियमपासून शाही मशिदकडे जाणाऱ्या रस्त्यावरही अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभी केली जातात. त्यापैकी एक ते दोन वाहने मागील काही महिन्यांपासून एकाच जागी उभे आहेत. या वाहनांवर धुळीचा धच साचला आहे. प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावरही तीन ठिकाणी अशाच पद्धतीने बेवारस अवस्थेतील वाहने उभी आहेत. बीएसएनएल कार्यालयाजवळील एक ट्रॅक आणि एक ओमनी या दोन वाहनांची तर दुरवस्था झाली आहे. या वाहनांचे सुटे भाग गायब झाले असून ही वाहने नेमकी कोणाची असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासकीय इमारतीच्या परिसरात एक जीप मागील काही वर्षांपासून एकाच जागी उभी करुन ठेवण्यात आली आहे. या जीपचेही सुटे भाग गायब झाले आहेत. टायर पंक्चर असून ही जीप एका ठिकाणाहून हलविणे आता जिकीरीचे झाले आहे. वसमतरोडवरही याच पद्धतीने वाहने उभी करण्यात आली आहेत. यापैकी काही वाहने याच परिसरात असलेल्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली असावी, असा अंदाज आहे. मात्र ही वाहने सार्वनजिक ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभी करुन ठेवल्याने या वाहनांचे पुढे काय? असा प्रश्न निर्माण होतो. काही भागात वाहनांमुळे वाहतुकीला अडथळाही होत आहे.
संयुक्त मोहीम राबविणार
शहरातील विविध भागांमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्या संदर्भात मनपाच्या बैठकीत काही दिवसांपूर्वीच चर्चा झाली आहे. या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन ही वाहने हटविण्याच्या संदर्भात लवकरच कारवाई केली जाईल. सध्या कोरोनाचा संसर्ग सुरु असल्याने आम्ही कोरोना नियंत्रणालाच प्राध्यान दिले आहे, असे मनपा आयुक्त देविदास पवार यांनी सांगितले.
कारवाईसाठी वरिष्ठांच्या परवानगीची प्रक्रिया
रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांच्या संदर्भात वाहतूक शाखेला कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. त्या संदर्भात पाठपुरावा सुरु आहे. लवकरच संयुक्त बैठक घेऊन त्यात निर्णय घेतला जाईल. ही वाहने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याच्या संदर्भाने आमच्याकडे तक्रारी नाहीत; परंतु, तरीही कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करु, असे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन काशीकर यांनी सांगितले.