मानवतमध्ये रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाडाने वाहतूक खोळंबली; वारंवारच्या बिघाडाने प्रवासी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 01:34 PM2020-03-16T13:34:08+5:302020-03-16T13:42:05+5:30
सिग्लन यंत्रणेतील बिघाडाची तीन दिवसांतील दुसरी वेळ
मानवत (जि. परभणी) : तालुक्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने तब्बल पाऊणतास धर्माबाद- मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस स्थानकाबाहेरच थांबविण्यात आली. तीन दिवसांमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड होण्याची ही दुसरी घटना आहे. वारंवार सिग्नल यंत्रणेत बिघाड होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मानवत शहरापासून ८ कि.मी. आणि पाथरी शहरापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या मानवत रोड रेल्वे स्थानकाचा वापर दोन्ही तालुक्यातील प्रवाशांना होतो. दररोज हजारो प्रवासी या स्थानकावरुन प्रवास करतात. मात्र मागील तीन दिवसांपासून सिग्नल यंत्रणेत बिघाड होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परभणीहून निघालेली धर्माबाद-मनमाड रेल्वे मानवत रोड रेल्वेस्थानकाजवळ आली. बिघाड झाल्याने स्थानकापासून ५०० मीटर अंतरावर सिग्नलच्या बाहेर ही गाडी थांबवावी लागली. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी ४५ मिनिटे लागला. त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला. अगोदरच एक तास उशिराने धावत असलेली मराठवाडा एक्सप्रेस मानवत रोड रेल्वे स्थानकावरून ४५ मिनिटे उशिराने पुढील प्रवासाला निघाली. तीन दिवसांपूर्वीही नांदेड-दौंड या रेल्वेतील प्रवाशांनाही बिघाडाचा सामना करावा लागला.
उड्डाण पुलाचे काम संथ गतीने : राष्ट्रीय महामार्गावर मानवत-परभणी दरम्यान बायपास मार्ग तयार केला जात आहे. या मार्गामुळे परभणीचे अंतर २ ते अडीच कि.मी.ने कमी होणार आहे. मात्र उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक मानवत रोडकडून प्रवास करतात. या मार्गावरील रेल्वे फाटक दिवसभरात ३५ ते ४० वेळा बंद राहते. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
रेल्वे फाटकही एक तास बंद
यंत्रणेत बिघाड झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रेल्वे फाटक बिघाड दुरुस्त होईपर्यत बंद ठेवले जाते. त्यामुळे वाहनचालकांंना फाटकावर ताटकळत थांबावे लागते. येथील रेल्वे फाटकाचे कनेक्शन सिग्नल यंत्रणेशी असल्याने मानवत स्थानकावरून आलेली रेल्वे पुढील स्थानकाकडे निघाल्यास रेल्वे स्थानकापासून ५०० मीटर अंतराच्या पुढे गेल्यानंतर फाटक आपोआप उघडते. मात्र बिघाडाच्या काळात हे फाटक बंद राहत असल्याने त्याचा फटका रेल्वे प्रवाशांसह राष्ट्रीय माहामार्गावरील प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे.