एसटीचे सीमोल्लंघन; प्रवासी मात्र घरातच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:13 AM2021-07-10T04:13:31+5:302021-07-10T04:13:31+5:30
परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांतील सात आगारांचा कारभार पाहिला जातो. या सात आगारांमधून ...
परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांतील सात आगारांचा कारभार पाहिला जातो. या सात आगारांमधून सद्य:स्थितीत ४४५ बस उपलब्ध असून, कोरोनाच्या संसर्गामुळे राज्य शासनाने निर्बंध लावल्याने मागील दीड वर्षापासून या बस जागेवरच उभ्या होत्या. मात्र, ५ जुलैपासून जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत २६० बस सुरू असून, बसच्या माध्यमातून १ हजार २५० फेऱ्या दिवसभरात पूर्ण करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे राज्यासह परराज्यातही या बस धावत आहेत. मात्र एकीकडे एसटी महामंडळ सेवेचे सीमोल्लंघन झाले असताना दुसरीकडे मात्र प्रवासी घरातच असल्याने एसटी महामंडळाला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. परिणामी तोटा सहन करीत प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीची बस सेवा राज्यासह परराज्यात धावत असल्याचे दिसून येत आहे.
पुन्हा तोटा वाढला
एसटी महामंडळाच्या ४४५ बसपैकी दुसऱ्या लाटेनंतर सात आगारांतून केवळ २६० बस रस्त्यावरून धावत आहेत. या बसच्या माध्यमातून केवळ दहा हजारांच्या घरात प्रवाशांची दररोज ने-आण करण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे डिझेलची दररोज होणारी वाढ आणि दुसरीकडे प्रवाशांचा न मिळणारा प्रतिसाद यामुळे एसटी महामंडळाची सेवा सुरू झाली असली तरी तोट्यात भर पडत असल्याचे दिसून येत आहे.
दुसऱ्या राज्यातील प्रवासी मिळेनात
परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या परभणी, पाथरी, जिंतूर व गंगाखेड या चार आगारांतून बस सेवा सुरू करण्यात आली असली तरी परराज्यातील प्रवासी अद्यापही बस सेवेकडे येत नसल्याचे दिसून येत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत व हिंगोली या दोन आगारांतूनच हिंगोली- हैदराबाद, वसमत-हैदराबाद या दोन बस गाड्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही दुसऱ्या राज्यातील बससाठी प्रवासी मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
अनेक मार्गांवरील फेऱ्या बंद
परभणी जिल्ह्यातील चार अगारांमधून ५ जुलैपासून बस सेवा सुरू करण्यात आली असली तरी अद्यापही ग्रामीण भागात पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू करण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खाजगी अवैध वाहतुकीचा सहारा घेऊन आपला प्रवास पूर्ण करावा लागत आहे. विशेष म्हणजे दुपटीचे भाडे मोजत जीव धोक्यात घालून परभणी शहर गाठावे लागत आहे. याकडे विभागीय कार्यालयाने लक्ष देऊन ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
पुणे मार्गावर वाढली प्रवाशांची गर्दी
परभणी येथील विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाथरी, गंगाखेड, परभणी व जिंतूर या चार आगारांमधून पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू झाली आहे. मात्र, केवळ पुणे मार्गावर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. इतर मार्गांवर मात्र सध्या तरी एसटी तोट्यातच सुरू असल्याचे दिसून येत आहे.