युट्यूबवर पाहून गॅसकटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न सायरन वाजल्याने अपयशी, पाच जण ताब्यात
By राजन मगरुळकर | Published: July 17, 2023 06:06 PM2023-07-17T18:06:02+5:302023-07-17T18:06:42+5:30
स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणला गुन्हा
परभणी : एमआयडीसी परिसरातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करताना चोरट्यांनी रेकी पद्धतीचा अवलंब केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. यातील पाच आरोपींना पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, एटीएम फोडण्यापूर्वी त्यांनी यासाठी लागणारे साहित्य एमआयडीसी भागातील अन्य एका ठिकाणाहून चोरल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दोन चोरीच्या घटनांचा उलगडा झाला आहे.
एटीएम चोरी प्रकरण व गॅस कटर चोरीच्या गंभीर गुन्ह्यातील टोळीचा छडा पोलीस दलाने घटनेनंतर ४८ तासातच लावला. पुढील तपास करण्याच्या अनुषंगाने पाच दिवस गोपनीयता बाळगण्यात आली. एटीएम मधील चोरी प्रकरण मंगळवारी सकाळी उघडकीस आले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने याचा तपास केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्हीमधील संशयितांची माहिती गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत घेण्यात आली. त्यामध्ये सदरील गुन्हा हा आरोपी लक्ष्मण पांडुरंग ढोबळे (रा.अहिल्याबाई होळकर नगर, वसमत रोड) याने त्याच्या साथीदारासह केल्याचे समजले. त्यास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता अन्य चार जण ज्यामध्ये अनिल गौतम वाळवंटे (रा.महात्मा फुले नगर), विनोद भगवान राठोड (रा.राधा नगर), हर्षद इंगळे, आकाश इंगळे (दोघे रा. नांदापूर) यांच्यासोबत सदरील चोरीचा प्रयत्न युट्युब वरील व्हिडिओ पाहून केल्याचे व अन्य चोरीचा प्रकारही केल्याची कबुली आरोपीने दिली. या गुन्ह्यात वापरलेली एक स्कुटी जप्त करण्यात आली. सदर पाच आरोपींना नवा मोंढा ठाण्यात तपास कामी हजर केले आहे.
आधी एमआयडीसीत केली चोरी
सदरील चोरट्यांनी एमआयडीसीच्या प्लॉट नंबर सी-२३ येथून गॅसकटर , ऑक्सिजन, एक सिलेंडर असे साहित्य चोरून आणले आणि त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम चोरीचा प्रयत्न केला. परंतू, प्रयत्न करूनही एटीएम तोडून पैसे चोरणे शक्य झाले नाही. यानंतर बराच कालावधी लोटल्यावर एटीएममध्ये सायरन वाजल्याने आरोपींनी भीतीपोटी तेथून पळ काढला.
असा केला प्रयत्न
सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी सकाळपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडिया एमआयडीसी परिसरच्या एटीएम येथे निर्जन वस्तीतील बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर बँक हेरून त्यामधील असणाऱ्या एटीएमची व बँकेची रेकी संबंधितांनी केली. रेकीप्रमाणे आरोपींनी बँकेच्या इमारतीवर असणाऱ्या कॅमेऱ्याची दिशा बदलून ते स्वतः कॅमेऱ्यात दिसणार नाहीत, याची खबरदारी घेतली. त्यानंतर एक जण मुख्य रस्त्यावर, एक जण बँकेच्या पाठीमागील रस्त्यावर, एक जण बँकेच्या मुख्य गेटमध्ये निगराणीस ठेवण्यात आले व दोन मुख्य आरोपींनी चेहऱ्याला मास्क बांधून हातात एटीएम तोडण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर एटीएम हत्याराने तुटत नसल्याने आरोपींनी पुन्हा एकत्र जमून मशीन तोडण्यासाठी एमआयडीसी भागातून सर्व साहित्याची चोरी केली आणि पुन्हा प्रयत्न केला.
यांनी उलगडला गुन्हा
पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, सुभाष अनमूलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कवाळे, राजेंद्र मुंडे, रामकिशन नांदगावकर, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पूयड, नागनाथ तुकडे, बालासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, विलास सातपुते, आशा सावंत, दिलावर खान, हरी खूपसे, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, निकाळजे, घुगे, केंद्रे, अर्जुन टाक, मुंडे, चव्हाण, अनिल कटारे, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी कारवाई केली.