शासकीय गोडाऊन बाहेरून ट्रक चोरीला; २५० क्विंटल स्वस्तधान्य गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 07:18 PM2022-07-26T19:18:47+5:302022-07-26T19:19:32+5:30
पालम तालुक्यातील शासकीय गोडाऊन परिसरात घटना
पालम : तालुक्यातील पेठशिवणी येथील शासकीय धान्य गोडाऊन परिसरात लावलेला लावलेल्या ट्रकची चोरी करून त्यातील 250 क्विंटल गहू गायब करण्यात आले. सोमवारी (ता.२५) रात्री उशिरा या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पालम तालुक्यातील केरवाडी येथील ट्रक चालक विनायक भगवानराव सोळंके (46) यांनी या प्रकरणी फिर्यादी दिली आहे. 23 जुलै रोजी सोळंके यांनी हिंगोली येथून ट्रकमध्ये (एमएच - 13, एएक्स- 3247 ) स्वस्तधान्य पुरवठ्याची २५० गव्हाची पोती भरली. रविवारी 24 जुलै रोजी रात्री 8 वाजता पालम तहसील कार्यालयाच्या पेठशिवणी येथील शासकीय धान्य गोदामात सोळंके ट्रकसह पोहचले.
त्यानंतर 25 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सोळंके गोदामात पोहोंचले. मात्र, त्यांना ट्रक दिसून आला नाही. त्यांनी तत्काळ पालम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यात 6 लाख रुपये किमतीचे 250 क्विंटल गहू असल्याचे फिर्यादीत नमूद केले. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मारूती कारवार यांच्या पथकाला लोहा तालुक्यातील बोरगाव रोड सुभाष नगर येथील राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आढळून आला. पोलिसांनी ट्रकमध्ये पाहणी केली असता त्यातील सर्व धान्य गायब होते. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन पालम पोलीस ठाण्यात आणला आहे. पुढील तपास सपोनि कारवार करीत आहेत.