त्रिधारा शुगर्सने मजुरांच्या खात्यात भरली रक्कम, २१ कोटींची फसवणूक प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 05:46 AM2018-03-14T05:46:56+5:302018-03-14T05:46:56+5:30
बनावट कागदपत्र बनवून ऊस तोडणी कामगारांच्या नावावर त्रिधारा शुगर्स व तत्कालीन संचालकांनी २१ कोटी रुपये उचलून फसवणूक केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्याची दखल घेत ही रक्कम मजुरांच्या खात्यावर भरल्याने बँकेने त्यांना बेबाकी प्रमाणपत्र दिले आहे.
जिंतूर (जि.परभणी) : बनावट कागदपत्र बनवून ऊस तोडणी कामगारांच्या नावावर त्रिधारा शुगर्स व तत्कालीन संचालकांनी २१ कोटी रुपये उचलून फसवणूक केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. त्याची दखल घेत ही रक्कम मजुरांच्या खात्यावर भरल्याने बँकेने त्यांना बेबाकी प्रमाणपत्र दिले आहे.
जिंतूर तालुक्यातील १०० ऊस तोडणी मजूर व जिल्ह्यातील इतर ठिकाणचे ३२० अशा ४२० मजुरांच्या नावावर ट्रॅक्टर, बैलगाडी, ट्रॅक्टर दुरुस्ती दाखवून आॅक्टोबर २०१३ मध्ये १४ कोटी ८० लाख रुपये जवळा बाजार येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेने त्रिधारा शुगर्सला कर्ज दिले होते. चार वर्षानंतर कर्ज उचलल्याचा प्रकार उघडकीस आला. मजुरांनी लोकप्रतिनिधी, बँकांचे उंबरठे झिझवूनही त्यांना न्याय मिळत नव्हता. ‘लोकमत’ने त्याचे वृत्त दिल्यानंतर बँक व कारखाना प्रशासन जागे झाले; परंतु, कर्जखात्यात रक्कम भरण्यास कारखान्याच्या तत्कालीन अध्यक्षांनी फारसा उत्साह दाखविला नाही. कामगारांना सप्टेंबर २०१७ मध्ये कर्ज वसुलीच्या पुन्हा नोटिसा आल्या.