भगवंतासह संतांवर विश्वास ठेवा; ते चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही: बागेश्वर महाराज शास्त्री
By ज्ञानेश्वर भाले | Published: December 12, 2023 05:58 PM2023-12-12T17:58:43+5:302023-12-12T17:58:58+5:30
भगवंतासह साधुसंतांनी आपल्याला सातत्याने सत्याचा आणि धर्माचा मार्ग दाखवला आहे
परभणी : हनुमंतासह भगवंत आणि साधुसंतांवर आपला विश्वास हवा, याच विश्वासावर आपले जीवन सार्थक केल्याशिवाय राहणार नाही. कारण, त्यांनी विश्वकल्याणाची हाक दिल्यामुळे ते आपल्याला कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नसल्याचे प्रतिपादन बागेश्वर महाराज शास्त्री यांनी केले. पाथरी रोडवरील लक्ष्मीनगरीत श्री सीताराम सेवा समितीतर्फे आयोजित हनुमंत कथा आणि दिव्य दरबार कार्यक्रमात ते मंगळवारी प्रवचनात बोलत होते.
भगवंतासह साधुसंतांनी आपल्याला सातत्याने सत्याचा आणि धर्माचा मार्ग दाखवला आहे, त्यांनी दिलेल्या मार्गापासून कधीही दूर जाऊ नयेत. त्यांनी दाखवलेला मार्ग धर्माचे आचरण आणि सदाचाराचा असल्यामुळे त्या मार्गानेच मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. मी परभणीत कुठलाही चमत्कार दाखवायला आलेलो नाही, तुमचा संपर्क भगवंतासह हनुमानाशी व्हावा, यामधील सेतू जोडण्यासाठी मी इथे आलो असल्याचे शास्त्री महाराजांनी स्पष्ट केले.
तांत्रिक मांत्रिकांच्या मागे न जाता संकटमोचन हनुमानासह भगवंत, साधुसंतांनी सांगितलेल्या मार्गानेच जायला हवे, ते आपल्याला कधीच चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही. भगवंताच्या दरबारातच सर्व अडचणींचे निराकरण होते, त्यांच्यावर विश्वास ठेवा ते कधीही आपल्याला चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही. त्यामुळे आपण भक्तिभावाने धर्म आणि धर्माच्या आचरणानुसार वागणूक ठेवावी, असे बागेश्वर महाराज शास्त्री आपल्या प्रवचनात सांगितले.