अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीस वीस वर्ष सक्तमजुरी
By राजन मगरुळकर | Published: June 22, 2023 01:45 PM2023-06-22T13:45:56+5:302023-06-22T13:46:19+5:30
सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले.
परभणी : अल्पवयीन मुलीवर घरी कोणी नसताना लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्याचा निकाल परभणी जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश-१ एस.एस.नायर यांनी गुरुवारी दिला आहे. यामध्ये आरोपीस पोक्सो कायद्यामध्ये वीस वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सेलू ठाण्यात २२ मार्च २०२२ रोजी पीडित मुलीच्या आईने आरोपी वैभव बाबाराव कदम (रा.साईबाबा नगर, परभणी, ह. मु.हमालवाडी, सेलू) याच्याविरुद्ध फिर्यादी दिली होती. आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीवर घरी कोणी नसताना लैंगिक अत्याचार केला. सदरील आरोपीने जबरदस्तीने अत्याचार केल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. जिल्हा न्यायाधीश-१ एस.एस.नायर यांनी सर्व साक्षपुराव्याचे अवलोकन करून गुरुवारी आरोपी वैभव कदम यास कलम ४ (२) पोक्सो कायद्यामध्ये वीस वर्षाचा सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद, कलम ४५२ भादवीमध्ये एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, कलम ५०६ भादवीमध्ये एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी अभियोक्ता आनंद गिराम यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर.यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, अंमलदार शिवाजी भांगे, वंदना आदोडे, प्रमोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.
एकूण सहा साक्षीदार तपासले
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक आर.जी.गाडेवाड यांनी केला. या प्रकरणी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडितेची साक्ष तसेच वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरला.