सहा आरोग्य केंद्रांना सव्वा दोन कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:22 AM2021-08-21T04:22:27+5:302021-08-21T04:22:27+5:30
कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची दुरवस्था, उपलब्ध साहित्याचा अभाव, पाण्याची कमतरता ...
कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीची दुरवस्था, उपलब्ध साहित्याचा अभाव, पाण्याची कमतरता आदी बाबींची उणीव असल्याने रुग्णांना उपचारासाठी थेट तालुक्याचे ठिकाण गाठावे लागत होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळावी, यासाठी राज्य शासनाने आरोग्याचा प्रादेशिक अनुशेष दूर करण्यासाठी २०२१ - २२ या आर्थिक वर्षात निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजेश विटेकर यांचा पाठपुरावा
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी मिळावा, यासाठी जि. प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची जालना व मुंबई येथे नुकतीच भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यानुसार बनवस प्राथमिक आरोग्य केंद्राला ५१ लाख ४ हजार, असोला केंद्राला ८० लाख, चिकलठाणा केंद्राला २० लाख, शेळगाव येथील केंद्रास ३५ लाख, आर्वी येथील केंद्रास ३० लाख, तर एरंडेश्वर येथील आरोग्य केंद्रास १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातून इमारत बांधकाम, फर्निचर, पाणीपुरवठा, संरक्षक भिंत आदी कामे करण्यात येणार आहेत.