लसीकरणाच्या दोन टप्प्यात अडीच टक्के डोस वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:16 AM2021-01-21T04:16:59+5:302021-01-21T04:16:59+5:30
परभणी : कोरोनाच्या लसीकरणाच्या दोन टप्प्यामध्ये ६२३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले असून, या मोहिमेत उपलब्ध झालेल्या डोसेसपैकी ...
परभणी : कोरोनाच्या लसीकरणाच्या दोन टप्प्यामध्ये ६२३ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले असून, या मोहिमेत उपलब्ध झालेल्या डोसेसपैकी २.६६ टक्के डोस वाया गेले आहेत.
कोरोना या गंभीर आजारावर लस उपलब्ध झाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. शासनाच्या निर्देशानुसार सर्वप्रथम आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे. जिल्ह्यात १० हजार ८०० कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. जिल्ह्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लसीचे ९ हजार ३३० डोसेस प्राप्त झाले आहेत. १६ जानेवारी रोजी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात चार केंद्रांवर लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. ४०० जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३९४ कर्मचाऱ्यांनी पहिल्याच दिवशी लस घेतली. दुसऱ्या टप्प्यामध्ये १९ जानेवारी रोजी ४०० कर्मचाऱ्यांपैकी २२९ कर्मचाऱ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे. लसीकरणासाठी ४४ व्हायल उपलब्ध झाले होते. त्यापैकी ३७ व्हायल वापरण्यात आले. ७ व्हायल शिल्लक राहिले. १९ जानेवारी रोजी ४४ व्हायल (बॉटल) उपलब्ध करुन देण्यात आले. त्यापैकी २३ बॉटलचा वापर करण्यात आला. २१ शिल्लक राहिल्या आहेत. ही लस देत असताना पहिल्या टप्प्यात ५ आणि दुसऱ्या टप्प्यात ८ असे १६ डोसेस वाया गेले आहेत. त्याची टक्केवारी २.६६ एवढी आहे. सर्वसाधारणपणे लसीकरण करताना १० टक्के डोस वाया जातात. जिल्ह्यात हे प्रमाण केवळ २.६६ टक्केच राहिले आहे.
डोसेस मिळाले : ३९३०
डोस वाया गेले : १६
६२३ जणांना दोन टप्प्यात दिले डोस
१७७ जण राहिले अनुपस्थित.
वर्षांनुवर्षांपासून लस बनविणाऱ्या नामांकित कंपन्यांनी कोरोना प्रतिबंधक लस बनविली असून, ती अत्यंत सुरक्षित आहे, शासनाने देखील योग्य त्या उपाययोजना करुनच लस उपलब्ध करुन दिली आहे. लहान बालकांना लसीकरण केल्यानंतरही ताप येण्यासारखी लक्षणे दिसतात. कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्यानंतर ताप येणे, मळमळ होणे ही लक्षणे दिसतात. मात्र ही लक्षणे लसीचा दुष्परिणाम (साईड-इफेक्ट) नसून, लस योग्य पद्धतीने काम करीत असल्याची (वे ऑफ ॲक्शन) लक्षणे आहेत. शहरातील नामांकित डॉक्टरांनी देखील लसीकरण करुन घेतले आहे. त्यामुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही. न घाबरता लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सुरवसे यांनी केले आहे.