बोलेरो चोरण्याचा प्रयत्नातील दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:48 AM2021-02-20T04:48:52+5:302021-02-20T04:48:52+5:30
उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल व सहाय्यक पोलिस निरीक्षक माधव लोकुलवार, कर्मचारी चव्हाण हे गुरूवारी वालूर येथील घटनास्थळी ...
उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल व सहाय्यक पोलिस निरीक्षक माधव लोकुलवार, कर्मचारी चव्हाण हे गुरूवारी वालूर येथील घटनास्थळी भेट देऊन परत येत होते. त्यावेळी रात्री ८ वाजेच्या सुमारास शहरातील रायगड कॉर्नर येथे एक तरुण दुचाकीवरुन संशयीतरित्या आढळून आला. पोलिसांनी विचारणा केली असता, त्याने सुरेश संतोष राऊत (१७ रा. लोकमंगलनगर, सेलू ) अशी ओळख दिली. मात्र मोटारसायकलबद्दल समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यावरून त्याला दुचाकीसह सेलू पोलिस ठाण्यात आणण्यात आले. अधिक चौकशी केली असता एमएच २२ एके ४०३४ क्रमांकाची काळ्या रंगाची दूचाकी १६ फेब्रुवारी रोजी जिवाजी जवळा ता.सेलू येथुन दुपारी २ वाजता एका लग्नाच्या कार्यक्रमामधून चोरून आणल्याचे त्याने सांगितले. त्याचा साथीदार अभिजीत किशोर कुलकर्णी (वय १५, रा.सह्याद्री नगर, सेलू) यानेही रात्री रेल्वे स्टेशन रोडवरील डॉ.माकोडे यांच्या दवाखान्याच्या बाजूस असलेली पांढऱ्या रंगाची बेलोरो जीप चोरून नेण्याच्या प्रयत्नात असल्याचे आढळून आले. बोलेरो घेऊन नांदेड येथे नेण्याचा कट होता. त्यापूर्वीच अभिजितलाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात आणखी चार दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून दुचाकी चोरट्यांच्या टोळीशी आरोपीचा संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे आणखी काही वाहने या टोळीने पळविली असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संतोष माळगे, रामेश्वर मुंडे अधिक तपास करित आहेत.