परभणी-पाथरी रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; मनपा कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
By राजन मगरुळकर | Published: May 17, 2023 04:19 PM2023-05-17T16:19:50+5:302023-05-17T16:20:08+5:30
श्याम लक्ष्मणराव रेंगे हे महापालिका कर्मचारी महासंघाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये नुकतेच उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते.
परभणी : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात पंप ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पाथरी रोडवरील भाजी मार्केट समोर घडली. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मनपा सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, श्याम लक्ष्मणराव रेंगे असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. रेंगे हे मनपाच्या पाणीपुरवठा विभागात कारेगाव फिल्टर येथे पंप ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास श्याम रेंगे हे त्यांच्या दुचाकीवर पाथरी रोडवरील त्यांच्या घराकडे जात होते. त्यावेळी भाजी मंडई परिसरात समोरून येणाऱ्या दुचाकीची श्याम रेंगे यांच्या दुचाकीला धडक झाली. यामध्ये शाम रेंगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली. बुधवारी सकाळी पाथरी रोडवरील सिंहगड फार्म हाऊस परिसरातील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातामध्ये समोरून येणाऱ्या दुचाकीवर एका रुग्णाला साप चावल्याने त्यास परभणीच्या जिल्हा रुग्णालयात आणले जात होते. या दरम्यान हा अपघात झाला. मात्र, या प्रकरणी बुधवारी दुपारपर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता. सर्व घटनेला मनपा कर्मचाऱ्यांनी अधिकृत दुजोरा दिला. मयत शाम रेंगे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगी, मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.
मनपा कर्मचारी महासंघाचे होते उपाध्यक्ष
श्याम लक्ष्मणराव रेंगे हे महापालिका कर्मचारी महासंघाच्या नवीन कार्यकारिणीमध्ये नुकतेच उपाध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. या निवडीला सहा महिन्यांचा कालावधी लोटला होता. या त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे मनपा कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. महापालिकेच्या कर्मचारी महासंघाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी पाणीपुरवठा अभियंता मिर्झा तन्वीर बेग, इस्माईल शेख, के.के.आंधळे, नजम खान, विकास रत्नपारखी, अभिजीत कुलकर्णी, विशाल उफाडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.