सरपण आणणे बेतले जीवावर; करपरा धरणात मातेसह दोन बालकांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 06:09 PM2022-10-05T18:09:14+5:302022-10-05T18:09:35+5:30
जिंतूर तालुक्यातील निवळी येथील घटना, पाण्याचा अंदाज न आल्याचे बुडाल्याची चर्चा
- तुकाराम सर्जे
बोरी (जि.परभणी) : सरपण आणण्यासाठी ३० वर्षीय महिला दोन बालकांसह जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरण परिसरात मंगळवारी सकाळी १० वाजता गेली होती. यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोन बालकांचे मृतदेह या धरणाच्या पाण्यावर तरंगताना आढळून आली होती. तर आज सकाळी महिलेचा मृतदेह धरणात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
निवळी बुद्रुक येथील नसरीन रसूल पठाण (३०), आयान रसूल पठाण (तीन वर्ष), सना रसूल पठाण (वय दीड वर्ष) अशी मयतांची नावे आहेत. जिंतूर तालुक्यातील निवळी येथील नसरीन रसूल पठाण या सरपण आणण्यासाठी करपरा धरण परिसरात मंगळवारी सकाळी दोन बालकांसह गेल्या होत्या. तहान लागल्यामुळे धरणकाठी पाणी आणण्यासाठी त्या बालकांना घेऊन गेल्या असता त्यांचा तोल गेल्याने निवळी धरणामध्ये त्या बुडाल्याचा संशय मंगळवारी दुपारी काही जणांना आला.
दरम्यान, त्यानंतर बोरी पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य सुरू झाले. मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोन चिमुकले या पाण्यात तरंगताना आढळून आले. मात्र, महिला बेपत्ता असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शोध कार्य चालू होते. परंतू, अंधारामुळे शोधकार्य थांबले. यानंंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू केले असता बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास जलाशयातील पाण्यामध्ये नसरीन रसूल पठाण या देखील मृत अवस्थेत आढळून आल्या. या घटनेत सना रसूल पठाण (वय दिड) आयान रसूल पठाण (वय तीन) या बालकांचा व महिलेचा मृत्यू झाला.
११ वर्षीय मुलीचा वाचला जीव
दरम्यान, ११ वर्षीय मुलगी शाळेत गेली होती म्हणून तिचा जीव वाचला, अशी चर्चा येथे सुरु होती. घटनास्थळी बोरी पोलिसांनी पंचनामा केला असून मृतकाचे शवविच्छेदन बोरीच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. बोरी ठाण्यामध्ये शेख महबूब शेख दादामिया (रा.जिंतूर) यांच्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सपोनि.वसंत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, के.जी.पतंगे, तूपसुंदर हे करीत आहेत.