निळा-कंठेश्वर बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 06:55 PM2020-05-30T18:55:36+5:302020-05-30T18:58:28+5:30
पाण्याच्या अंदाज न आल्याने बुडून मृत्यू
पूर्णा : निळा-कंठेश्वर शिवारातील कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ( दि.३० ) दुपारी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील निळा येथील तीन मुले दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावालगत असलेल्या पूर्णा नदी पात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी कल्याण उमाजी सूर्यवंशी ( १६ ) व ज्ञानेश्वर शिवाजी सुर्यवंशी ( १९ ) या दोघांनी पाण्यात उडया मारल्या. परंतु, बऱ्याच वेळाने दोघे पाण्यातून बाहेर आले नाहीत. यामुळे तिसरा मुलगा घाबरून गेला आणि गावात मदतीसाठी धावला. त्यांनतर नागरिकांनी बंधाऱ्यात शोध घेतला असता दोघेही अत्यवस्थ स्थितीत आढळून आले. त्यांना बाहेर काढून तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मृत कल्याण हा परभणी येथील नवोदय विद्यालयात तर ज्ञानेश्वर हा पूर्णा येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. घटने मुळे संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.