परभणीमध्ये लसीकरणानंतर दोन बालके दगावली; दोघे अत्यवस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 07:03 AM2018-11-08T07:03:23+5:302018-11-08T07:03:39+5:30
आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित लसीकरण मोहिमेत दोन बालके दगावल्याची घटना बुधवारी सकाळी पालम तालुक्यातील रोकडेवाडीत घडली. आणखी दोन बालके अत्यवस्थ असून, त्यांच्यावर गंगाखेड येथे उपचार सुरू आहेत.
परभणी - आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित लसीकरण मोहिमेत दोन बालके दगावल्याची घटना बुधवारी सकाळी पालम तालुक्यातील रोकडेवाडीत घडली. आणखी दोन बालके अत्यवस्थ असून, त्यांच्यावर गंगाखेड येथे उपचार सुरू आहेत.
रोकडेवाडी येथे आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी फिरून बालकांना बीसीजी बूस्टर, पोलिओ व व्हिटॅमिन सी आदी लसी देत होते. मंगळवारी दुपारी गावातील राधाकृष्ण गोपाळ सकनूर (४ महिने) या बालकास बीसीजी बूस्टर, तर राम व्यंकटी निळे व लक्ष्मण व्यंकटी निळे (१ महिना) या जुळ्यांना बीसीजी बूस्टर व पोलिओ प्रतिबंधक लस दिली गेली. विद्या दत्तराव माखणे (२) या बालिकेस डीपीटी बूस्टरची लस दिली गेली.
या चारही बालकांना रात्री ताप आला. गंगाखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी राधाकृष्ण व राम या बालकांचा मृत्यू झाला. विद्या व लक्ष्मण यांच्यावर उपचार सुरू आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कालिदास निरस यांचे पथक गावात तपासणी करीत आहे.
निष्काळजीपणा जबाबदार
लसीकरण करताना बालकाचे वजन किमान अडीच किलो असणे आवश्यक आहे. मात्र, राम व लक्ष्मण या दोघांचेही वजन फक्त सव्वा किलो होते. आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरण करीत असताना त्यांच्या वजनाची पडताळणी केली नाही.
त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. आरोग्य कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.