येलदरी धरणाचे दोन दरवाजे उघडले; पूर्णा नदी पात्रात एकूण ६ हजार २२४ क्युसेक्स विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 02:09 PM2022-09-12T14:09:51+5:302022-09-12T14:10:07+5:30

पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

Two gates of Yeldari Dam opened; 6 thousand 224 cusecs discharge in Purna river basin | येलदरी धरणाचे दोन दरवाजे उघडले; पूर्णा नदी पात्रात एकूण ६ हजार २२४ क्युसेक्स विसर्ग

येलदरी धरणाचे दोन दरवाजे उघडले; पूर्णा नदी पात्रात एकूण ६ हजार २२४ क्युसेक्स विसर्ग

googlenewsNext

येलदरी (परभणी) : पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे येलदरी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरण सध्या  १०० टक्के भरले असल्याने आज दुपारी १२ वाजता धरणाची २ दरवाजे अर्धा मीटरने उचलण्यात आली आहेत. दोन्ही दरवाजातून ४४२४ क्युसेक्स आणि जलविद्युत केंद्राचे १८०० क्युसेक्स असे एकूण ६२२४ क्युसेक्स एवढा विसर्ग पूर्णा नदी पात्रात होत असल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणारे  येलदरी व सिध्देश्‍वर जलाशयातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ही दोन्ही धरणे मागील चार वर्षांपासून सलग १०० टक्के भरली आहेत. नांदेड, परभणी व हिंगोली या तीन जिल्ह्यातील ६० हजार हेक्टर क्षेत्रातील शेत जमिनीचा सिंचनाचा प्रश्न यामुळे मिटला आहे. तर पुढील वर्षभर या तिन्ही जिल्ह्यातील महत्वाच्या शहरासह शेकडो गावे, वाड्या मधील पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.  

दरम्यान, धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे येलदरी धरणावरील जल विद्युत केंद्राचे दोन युनिट सुरू करून १८०० क्युसेक्स पाणी पूर्णा नदी पात्रात सोडण्यात आले. दि ८ सप्टेंबर रोजी धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला. येलदरी धरणाच्या वरच्या भागात असलेल्या खडकपूर्णा धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील चांगला पाऊस पडत असल्यामुळे येलदरी धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणाचे २ मुख्य दरवाजे अर्धा मीटरने उचलून आज दुपारी १२ वाजता ४४२४ क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे सध्या धरणातून एकूण ६२२४ क्युसेक्स विसर्ग होत आहे.  

या पार्श्‍वभूमीवर परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हा प्रशासनाने पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा बजावला आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, वाहने, जनावरे सोडू नयेत, कोणतीही जिवीत व वित्त हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी,तसेच नदी पात्रातील विद्युत पंप सुरक्षित स्थळी काढून ठेवावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त होऊ शकतो अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. 

Web Title: Two gates of Yeldari Dam opened; 6 thousand 224 cusecs discharge in Purna river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.