दोन सख्या चुलत भावांवर काळाचा घाला; आरखेड गावात पेटल्या नाहीत चुली
By ज्ञानेश्वर भाले | Published: May 2, 2023 06:25 PM2023-05-02T18:25:32+5:302023-05-02T18:26:42+5:30
पालम तालुक्यातील आरखेड गावावर शोककळा; एकाचा पाण्यात बुडून, दुसऱ्याचा अपघाती मृत्यू
पालम (जि. परभणी) : आधीच एकाचे मातृछत्र, तर दुसऱ्याचे पितृछत्र हरवलेल्या दोन सख्या चुलत भावांवर काळ कोपला. दोन दिवसांच्या अंतराने या दोन भावांचा मृत्यू झाला असून, सदर घटनेमुळे पालम तालुक्यातील आरखेड गावावर शोककळा पसरली आहे. पहिली घटना ३० एप्रिलला, तर दुसरी घटना १ मे ला घडली. त्यात एकाचा पाण्यात बुडून, तर दुसऱ्याचा अपघाताने मृत्यू झाला.
आरखेड येथील राजकुमार तुकाराम दुधाटे (३०) यांचा पहिल्या घटनेत मृत्यू झाला. ते २८ एप्रिलला सकाळी पोहण्यासाठी गावालगत गोदावरी नदीत गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत बुडाले. दरम्यान, दोन दिवस ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. तरीही ते सापडले नव्हते. त्यानंतर ३० एप्रिलला गोळेगाव शिवारातील गोदावरी नदीत त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी चुलत भाऊ नितीन मारोतराव दुधाटे (२७) उपस्थित होते. त्यालाही दोन दिवसानंतर काळाने गाठले. त्यांचा अपघात नांदेडवरून पालमकडे येत असताना सोमवारी (ता. १) रात्री ९:०० वाजता झाला. दिवसभराचे कामकाज आटोपून दुचाकीने ते पालमकडे निघाले होते. त्यांच्या दुचाकीला पालमकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका ऑटोची धडक बसली. त्यात नितीन दुधाटे यांचा जागीच मृत्यू झाला. ते नांदेड जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखान्यात नोकरीस होते. एकाच घरातील दोन्ही कर्ते पुरूष गेल्याने दुधाटे कुटुंबीयांवर काळ रुसला.
आरखेड गावात पेटल्या नाहीत चुली
राजकुमार दुधाटे यांच्या पश्चात आई - वडील, पत्नी, तीन मुली आणि एक बहीण असा परिवार आहे. त्यातील एका मुलीचे वय दीड वर्षदेखील नाही. दुसरीकडे नितीन दुधाटे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक बहीण असा परिवार आहे. घरात एकही कर्ता पुरूष नाही. शिवाय, नितीन दुधाटे यांच्या विवाहाला दोन वर्षेही झाली नाहीत. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता. २) दुपारी १२:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेमुळे आरखेड गावात चुलीच पेटल्या नव्हत्या.