जिंतुरात राडा, दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी
By मारोती जुंबडे | Published: October 7, 2022 03:43 PM2022-10-07T15:43:48+5:302022-10-07T15:44:39+5:30
वेळीच जागरूक नागरिक व पोलीस प्रशासनामुळे परिस्थिती आटोक्यात आली. या प्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
जिंतूर : विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत ७ ते ८ जण जखमी झाले असून जिंतूर पोलिसात दोन्ही गटातील १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
जिंतूर येथे ६ ऑक्टोबर रोजी दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात सुरू झाली. जिंतूर गणेशोत्सवापाठोपाठ दुर्गादेवीच्या मिरवणुकीतही डीजेची धूम राहिली. कर्णकर्कश आवाज व धुंद झालेली तरुणाई बेधुंद होऊन नाचताना दिसली. हर्ष, उत्साहात सुरू असलेल्या या मिरवणुकीला चौक बाजाराच्या जवळ गालबोट लागले. मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली. विशेष म्हणजे या हाणामारीत फायटर, चाकू यांचा सर्रास वापर करण्यात आला. दोन धर्मीयांमध्ये झालेल्या भांडणाचे स्वरूप वाढते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु, वेळीच जागरूक नागरिक व पोलीस प्रशासनामुळे परिस्थिती आटोक्यात आली.
या राड्यामध्ये ६ ते ७ जण जखमी झाले. यावेळी दोन गटातील १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या संदर्भात कृष्णा संजय आनंदे यांनी जिंतूर परिसरात फिर्याद दिली की, दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत फिर्यादी व त्याचा मित्र नाचत असताना शहनाझ सिद्दिकी यास धक्का लागल्याने बाचाबाची झाली. त्यावेळी शहनाझ सिद्दिकीने हातातील फायटरने फिर्यादी व साक्षीदार यांच्या डोक्यात मारून जखमी केले. शिवाय शिवीगाळ व मारहाण करण्यात आली, तर चाकूनेही रवी कुलथे यास जबर जखमी करण्यात आले. या फिर्यादीवरून आरोपी शहनाझ सिद्दिकी, निजाम सिद्दिकी, सुलेमान सिद्दिकी, संतोष टाक व इतर तीनविरुद्ध जिंतूर पोलिसात पोलीस उपनिरीक्षक खोले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शहनाझ सिद्दिकी यांनी जिंतूर पोलिसात तक्रार दिली की, तुम्ही आमच्या डीजेसमोर का आलात इथून निघून जा, असे म्हणत फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, फायटरने मारहाण करून साक्षीदार संतोष टाक यांच्या घरात अनधिकृतरीत्या प्रवेश करून संतोषचे वडील नंदू टाक यांना मारहाण केली. म्हणून आरोपी कृष्णा आनंदे, महेश बाराते, कृष्णा कुलथे, रवी कुलथे, मयूर चांदजकर, विजय कुलथे, संजय आनंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या मारहाणीत सहा ते सात जण जखमी झाले आहेत.
पोलीस यंत्रणा कुचकामी
मागील काही दिवसांपासून जिंतूर शहरामध्ये पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. कायद्याचा धाक न राहिल्याने गुन्हेगारांना आयतेच रान मिळाले आहे. विशेष म्हणजे मिरवणुकीच्या दरम्यान पोलीस यंत्रणेने पुरेसा बंदोबस्त व मिरवणुकीमध्ये मद्य प्राशन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत. यापूर्वीचा इतिहास पाहता संबंधित यंत्रणेने मिरवणूक गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसते.
श्रवण दत्त यांच्या आठवणीला उजाळा
वेगवेगळे उत्सव व निवडणुकीदरम्यान गुन्हेगारांवर वचक कसा असावा, याचा प्रत्यय श्रवण दत्त यांच्या काळातील तीन वर्षात आला. मिरवणुकीत तर सर्रास शस्त्रांचा वापर करण्यात आला. याबाबत पोलीस यंत्रणा अनेकांना अभय देत असल्याचे दिसत आहे. यंत्रणेत जर कुचकामी असेल तर गुन्हेगारावर काय वचक राहणार हाच प्रश्न आता जिंतूरकरांना निर्माण झाला आहे.