सेलूत दोन गटातील हाणामारीत दोघे जखमी; परस्पर विरोधी गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 05:43 PM2019-01-29T17:43:37+5:302019-01-29T17:44:19+5:30
सेलू पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेलू (परभणी ) : क्षुल्लक कारणावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले.हा प्रकार विद्यानगर येथील विठ्ठल रुखमिनी मंदीराजवळ रविवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास घडला.याप्रकरणी दोन्ही गटाकडून फिर्याद देण्यात आली असून सेलू पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित लक्ष्मीकांत साखरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महेश कलालडे व विठ्ठल कलालडे यांनी तुझे दुकान तिकडे आहे तु इकडे चकरा का मारतोस असे म्हणून सुमित व समीर यांच्यावर चाकूने हल्ला केला असे नमूद केले आहे. या चाकू हल्ल्यात सुमित आणि समीर गंभीर जखमी झाले आहेत. सुमीत साखरे यांच्या तक्रारीवरून महेश सुरेशराव कलालडे व विठ्ठल कलालडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तर दुसरी फिर्याद महेश सुरेशराव कलालडे यांनी दिली असून त्यात म्हटले आहे की तु केदारला गल्लीत का घेऊन आला असे म्हणून सुमित लक्ष्मीकांत साखरे व समिर लक्ष्मीकांत साखरे या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच घरी जाऊन आई वडीलांना धमक्या दिल्या. फिर्यादीच्या भावास तलवारीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे नमूद केले आहे.
महेश कलालडे यांच्या फिर्यादीवरुन सुमित व समीर साखरे यांच्या विरुद्ध सेलु पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महेश व विठ्ठल कलालडे यांना अटक करण्यात आली आहे. तर सुमीत व समीर साखरे यांना उपचारार्थ परभणी येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे व पोलिस निरिक्षक संदिपान शेळके हे करत आहेत.